खासगी विमा क्षेत्रातील एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीने दिर्घकाळात खात्रीशीर उत्पन्न देणारी विमा योजना जाहीर केली आहे. एचडीएफसी लाईफ गॅरंटिड इन्कम इन्शुरन्स प्लॅननुसार ग्राहकाला आयुर्विमा सुरक्षा, कर वजावटीचा लाभ आणि मुदतपूर्ततेला खात्रीशीर उत्पन्न मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे.
या योजनेत नावाप्रमाणेच अनेक फायदे ग्राहकाला मिळणार आहे. गॅरंटिड इन्कम अर्थात जेव्हा या योजनेची मुदत पूर्ण होईल तेव्हा पॉलिसीधारकाला एक निश्चित रक्कम मिळेल. या योजनेअंतर्गत एका ठराविक वर्षांपर्यंत प्रिमीयम भरावा लागेल. त्यानंतर एका ठराविक वर्षांनंतर ग्राहकाला नियमित उत्पन्न सुरु होईल ते पॉलिसीची मुदत संपेपर्यंत सुरु राहील.
एचडीएफसी लाईफ गॅरंटिड इन्कम इन्शुरन्स प्लॅनमध्ये प्रिमीयम भरण्यासाठी 8 ते 15 वर्षांची टर्म आहे. तर पॉलिसी टर्म 16 ते 40 वर्ष या दरम्यान निवडता येईल. यात पॉलिसीधारकाला किती उत्पन्न (Income Payout) हवे आहे याची निवड करता येईल. दरवर्षाला सम अॅश्युअर्ड रकमेच्या 11%, 12% आणि 13% अशी निवडता येईल.
इन्कम पेआउटची रक्कम ही पॉलिसी प्रिमीयम पेमेंट टर्म आणि प्रिमीयमची रक्कम यावर अवलंबून असेल. या पॉलिसीमध्ये मॅच्युरिटी बेनिफिट्स मिळणार आहे. जेव्हा मुदतपूर्ती होईल तेव्हा पॉलिसीधारकाला सम अॅश्युरर्ड मिळेल. दुर्देवाने पॉलिसी कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना एकरकमी विमा भरपाई मिळेल. या योजनेचा एक फायदा असा की मृत्यूसाठी दिली जाणारी भरपाई रक्कम ही वार्षिक प्रिमीयमच्या रकमेच्या 10 पट अधिक असते. एकूण प्रिमीयमच्या भरपाईचे प्रमाण 105% इतके असू शकते.
एचडीएफसी लाईफ गॅरंटिड इन्कम इन्शुरन्स प्लॅनमध्ये ग्राहकाला अतिरिक्त सुविधा (Additional Riders) निवडण्याचा पर्याय आहे. यात पहिली सुविधा ही एचडीएफसी लाईफ टर्म रायडर ही आहे. यात पॉलिसीधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास या रायडर्समुळे वारसांना पॉलिसी सम अॅश्युरर्ड इतकीच रक्कम भरपाई म्हणून मिळते. या योजनेत दुसरा रायडर म्हणजे गंभीर आजारांवर विमा सुरक्षा. ही पॉलिसी घेतल्यानंतर गंभीर आजाराचे निदान झाले तर पॉलिसीधारकाला एकरकमी भरपाई दिली जाते. अशाच प्रकारे अपघातात पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्याला किंवा त्याच्या वारसांना अतिरिक्त भरपाई मिळते. मात्र यासाठी पॉलिसी घेताना रायडर्सची निवड करणे आवश्यक आहे.
असा मिळेल या पॉलिसीवर करलाभ
विमा पॉलिसी खरेदी केल्यावर ग्राहकाला आयकरातून सूट मिळते. विमा पॉलिसीवर प्रिमीयम कर वजावटीसाठी पात्र आहे. आयकर कलम 80 सी नुसार एका वर्षात करदात्याला 150000 रुपयांची कर वजावट मिळते. एचडीएफसी लाईफ गॅरंटिड इन्कम इन्शुरन्स प्लॅन हा आयकर कलम 80 सी नुसार कर वजावटीसाठी पात्र आहे.