ईपीएफओच्या (Employee's Provident Fund Organisation) या विमा योजनेबद्दलच्या महत्त्वाच्या बाबी पाहू. सर्वात आधी तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे, की ईपीएफओच्या तीन मुख्य योजना आहेत. प्रथम ईपीएफ योजना (EPF scheme, 1952), या अंतर्गत भविष्य निर्वाह निधीचा लाभ उपलब्ध आहे. त्यानंतर ईपीएफओची पेन्शन योजना आहे (पेन्शन योजना, 1995) म्हणजेच ईपीएस. याशिवाय आणखी एक योजना आहे, ती म्हणजे एम्प्लॉइज डिपॉझिट-लिंक्ड इन्शुरन्स स्कीम म्हणजेच ईडीएलआय (EDLI).
Table of contents [Show]
उपयुक्त योजना
ईडीएलआयचा लाभ प्रत्येक पगारदार व्यक्तीला उपलब्ध आहे, ज्यांच्या पगारातून पीएफ कापला जातो. ईडीएलआयअंतर्गत, प्रत्येक पगारदार व्यक्तीला 7 लाख रुपयांपर्यंतचं विमा संरक्षण मिळतं, ज्याचा पीएफ जमा आहे. जर संबंधित व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबीयांना या विम्याअंतर्गत ईपीएफओकडून 7 लाख रुपयांपर्यंतची मदत मिळते. त्याचा फायदा संबंधित व्यक्तीच्या नॉमिनीला मिळतो.
ईडीएलआयमध्ये योगदान
ईडीएलआयची आणखी एक खास बाब आहे. तुम्ही तुमच्या पगारात हे पाहिलं असेलच, की त्यातून ईपीएफ आणि ईपीएस पैसे कापले जातात, ईडीएलआय नाही. यामुळेच अनेकांना ईडीएलआय आणि त्याच्या फायद्यांविषयी फारशी माहिती नसते. कर्मचारी ईपीएफ आणि ईपीएसच्या अंतर्गत योगदानदेखील देतो, तर ईडीएलआयचं योगदान फक्त नियोक्त्याकडून म्हणजे तुमच्या कंपनीकडून घेतलं जात असतं.
कॉन्ट्रीब्यूशन किती?
ईडीएलआय योजनेअंतर्गत, कर्मचार्यांच्या मूळ पगाराच्या 0.5 टक्के आणि डीएच्या (DA) बरोबरीचं कॉन्ट्रीब्यूशन दिलं जातं. तुम्ही तुमची नोकरी बदलली तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत राहतो. अट एकच आहे, ती म्हणजे तुम्ही किमान एक वर्ष सतत काम केलं असेल आणि तुमचा पीएफ जमा होत असेल.
कव्हरेज कॅल्क्यूलेशन कसं?
कव्हरेजची व्याप्ती मागील 12 महिन्यांतील कर्मचाऱ्यांच्या सरासरी मासिक पगारावर आधारित आहे. ईपीएफओ सरासरीच्या 35 पट कव्हर देते. यामध्ये सरासरी मासिक वेतनाची कमाल मर्यादा 15 हजार रुपये आहे. अशाप्रकारे 15 हजारांच्या 35 पट म्हणजेच 5.25 लाख रुपयांचं कव्हरेज आपोआपच उपलब्ध होतें. याच्यावर संस्थेकडून 1.75 लाख रुपयांपर्यंतचा बोनस दिला जातो. त्यामुळे एकूण कव्हरेज 7 लाख रुपयांपर्यंत पोहोचतं.
कसा करायचा विम्याचा दावा?
हक्क सांगण्याची प्रक्रिया सोपी आहे. तुमच्या कुटुंबातल्या पगारदार व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत नॉमिनी विम्याचा दावा करू शकतो. नॉमिनीला पीएफ, पेन्शन आणि ईडीएलआयचा दावा संयुक्त दावा फॉर्मद्वारे करावा लागेल. या प्रक्रियेत मृत्यू प्रमाणपत्र, उत्तराधिकार प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे आवश्यक असतात. तुम्हाला ज्या खात्यात पैसे द्यायचे आहेत त्या खात्याचा रद्द केलेला चेकही तुम्हाला द्यावा लागेल.