मोबाइलवरून संपर्क साधून सध्या गुंतवणुकीचे (Investment) सल्ले दिले जात आहेत. यावेळी अशा गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगला परतावा मिळण्याचं आमिषही दाखवलं जात आहे. तर या फसवणुकीला अनेकजण बळीदेखील पडत आहेत. शेअर मार्केटतर्फे (Share market) वेळोवेळी गुंतवणूकदारांना सावध केलं जातं जेणेकरून लोकांना हानीबद्दल सांगता येईल. आतादेखील असाच एक इशारा एनएसईनं (National stock exchange) जारी केला आहे. त्यामुळे हे वृत्त केवळ वाचू नका तर ते गांभीर्यानं घेण्याचीही गरज आहे. पुढचा संभाव्य धोका किंवा नुकसान टाळण्यास मदत होईल. सीएनबीसीनं हे वृत्त दिलं आहे.
एनएसईचा इशारा काय?
एनएसईनं गुंतवणूकदारांना सतर्क करताना म्हटलं आहे,की हिमांशू ठक्कर नावाचा एक व्यक्ती जो न्यूयॉर्क लाइव्ह ट्रेड नावाच्या कंपनीशी संबंधित असल्याचं सांगतो. 9662096620 या मोबाइल क्रमांकावरून काम करत आहे. मात्र ही व्यक्ती लोकांची फसवणूक करत असल्याचं एनएसईच्या निदर्शनास आलं आहे. शेअर बाजार गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा देण्याचं सांगत आहे.
'अधिकृत नसलेली कोणतीही व्यक्ती धोकादायक'
ही व्यक्ती किंवा संबंधित कंपनी स्टॉक मार्केटमध्ये नोंदणीकृत नाही. एनएसईच्या कोणत्याही नोंदणीकृत सदस्याद्वारे अधिकृत नाही, असं स्टॉक मार्केटनं स्पष्ट केलं आहे. एनएसईनं सांगितलं आहे, की गुंतवणूक सल्ल्यानुसार कार्य करण्यास अधिकृत नसलेली कोणतीही व्यक्ती धोकादायक असू शकते. कारण अशा योजनांना एक्स्चेंजनं मान्यता दिलेली नसते. मार्केट अशा कोणत्याही योजनेला प्रोत्साहन देत नाही.
कशी टाळायची फसवणूक?
- फसवणूक टाळण्यासाठी उच्च परतावा देण्याचं आमिष देणाऱ्या असल्या सल्ल्यांपासून दूर राहावं.
- तुम्हाला गुंतवणुकीत चांगला परतावा हवा असेल तर संबंधित कंपनीची आधी माहिती घ्यावी.
- गुंतवणूकदार https://www.nseindia.com/invest/find-a-stock-broker या लिंकला भेट देऊन सर्व अधिकृत ब्रोकर्सची माहिती मिळवू शकतात.
- बँक खात्याचे तपशीलही याठिकाणी देण्यात आलेले आहेत. यावरून तुम्ही योग्य ब्रोकरशी बोलत बोलून नुकसान टाळू शकता.