Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

भारतीय अर्थव्यवस्थेने खरचं 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केलाय का? वाचा

GDP

Image Source : https://www.freepik.com/

देशातील मोठमोठे उद्योगपती आणि राजकीय नेत्यांनी ट्विट करत भारताच्या अर्थव्यवस्थेने 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केल्याचा दावा केला आहे. मात्र, सरकारकडून कोणतीही अधिृकत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

काही महिन्यांपूर्वी भारत ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनला होता. तर आता भारताच्या अर्थव्यवस्थेने 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. देशातील मोठमोठे उद्योगपती आणि राजकीय नेत्यांनी याबाबत ट्विट केले आहे. मात्र, याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत आकडेवारी जारी करण्यात आलेली नाही. खरचं भारताच्या अर्थव्यवस्थेने 4 ट्रिलियनचा टप्पा पार केलाय का? जाणून घेऊयात.

कुठून झाली 4 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या चर्चेला सुरुवात?

सोशल मीडियावर सध्या युट्यूब व्हीडिओचा एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केला असून, जर्मनीच्या अर्थव्यवस्थेच्या खूपच जवळ असल्याचा दावा केला जात आहे. हा फोटो अनेक सोशल मीडिया यूजर्सकडून शेअर केला जात आहे. 

राजकीय नेत्यांचे ट्विट 

भाजपच्या अनेक नेत्यांकडून या युट्यूब व्हीडिओचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये फडणवीस यांनी भारतीयांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. 

फडणवीस यांच्यासह गजेंद्र सिंग शेखावत, जी. कृष्ण रेड्डी, अर्जून राम मेघवाल या केंद्रीय मंत्र्यांनी देखील एक्सवर (ट्विटर) हा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. 

भारतीय अर्थव्यवस्थेने खरचं 4 ट्रिलियनचा टप्पा पार केलाय? 

एकीकडे केंद्रीय मंत्री व भाजप नेत्यांकडून भारतीय अर्थव्यवस्थेने 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अर्थ मंत्रालय व जीडीपी संदर्भातील आकडेवारी जारी करणाऱ्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सर्वसाधारणपणे तिमाहीच्या शेवटी व बजेटच्याआधी अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी जारी केली जाते. दरमहिन्याला किंवा प्रत्येक मिनिटाला ही आकडेवारी जारी केली जात नाही. जीडीपीबाबत पुढील आकडेवारी ही 30 नोव्हेंबर 2023 ला जारी केली जाईल. 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात वर्षाखेर भारताची अर्थव्यवस्था 301.75 लाख कोटी रुपये म्हणजेच 3.63 ट्रिलियन डॉलर्सपर्यत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये अर्थव्यवस्थेने 272.41 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला होता.

वर्ष 2025 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरच्या पुढे नेण्याचे लक्ष्य सरकारचे आहे. मात्र, भारताला डिसेंबर 2024 च्या अखेरीस 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठण्यासाठी जुलै ते डिसेंबर या दोन्ही तिमाहीत 10 टक्क्यांपेक्षा अधिक वृद्धी दराची गरज आहे. एप्रिल ते जून दरम्यान भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर हा 7.8 टक्के होता. या व्यतिरिक्त आरबीआयने देखील अर्थव्यवस्था वाढीचा वेग कमी असण्याची शक्यता वर्तवली होती.