शेअर मार्केट कोसळत असताना नव्याने बाजारात प्रवेश करणाऱ्या हर्षा इंजिनिअर्स इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीने गुंतवणूकदारांना बंपर नफा मिळवून दिला.हर्षा इंजिनिअर्सचा शेअर आज राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) 36% प्रिमियमसह सूचीबद्ध झाला.(Harsha Engineers International Limited debut with 36% premium)या धमाकेदार एंट्रीने IPOमध्ये शेअर प्राप्त झालेल्या भाग्यवान गुंतवणूकदारांनी पहिल्याच दिवशी कमाई केली.
हर्षा इंजिनिअर्स इंटरनॅशनल लिमिटेडची (HEIL) आज एनएसईवर नोंदणी झाली. हर्षा इंजिनिअर्सचा शेअर थेट 450 रुपयांवर खुला झाला. आयपीओवेळी हर्षा इंजिनिअर्सने प्रती शेअर 330 रुपयांचा भाव निश्चित केला होता.मात्र पहिल्याच दिवशी हर्षा इंजिनिअर्सने गुंतवणूकदारांना 36% फायदा मिळवून दिला.
अमेरिकी केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने तिसऱ्यांदा व्याजदर वाढवल्यानंतर जगभरातील शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड सुरु आहे. आज सेन्सेक्स 900 अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 300 अंकांनी कोसळला. यापूर्वी शुक्रवारच्या सत्रात देखील शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती.त्यामुळे आज हर्षा इंजिनिअर्सच्या लिस्टिंगकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते.मात्र प्रत्यक्षात हर्षा इंजिनिअर्सने एनएसईवर 450 रुपयांवर नोंद केली. बीएसईवर तो 444 रुपयांवर खुला झाला.
हर्षा इंजिनिअर्सने IPO मधून 755 कोटींचा निधी उभारला. कंपनीचा IPO 14 ते 16 सप्टेंबर 2022 दरम्यान खुला झाला होता. यासाठी प्रती शेअर 314 ते 330 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केला होता.IPO ला गुंतवणूकदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. IPO 74.7 पटीने सबस्क्राईब झाला होता. पात्र गुंतवणूकदारांचा राखीव हिस्सा(QIB) 178.26 पटीने सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 17.63 पटीने तर कर्मचाऱ्यांसाठीचा हिस्सा 12.07 पटीने सबस्क्राईब झाला होता.
IPO ला मिळालेला प्रतिसाद पाहता ग्रे मार्केटमध्ये हर्षा इंजिनिअर्सच्या शेअरला चांगली मागणी होती. ग्रे मार्केटमध्ये हर्षा इंजिनिअर्सच्या शेअरचा प्रिमीयम 160-165 रुपयांवर गेला. त्यामुळे या शेअरची जोरदार लिस्टिंग होणार असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला होता.