Surat Diamond Industry: रशियातील 'अलरोसा'ही जगातील सर्वात मोठी कच्च्या हिऱ्याची खाण आहे. या कंपनीचा 66 टक्के मालकीहक्क रशियन सरकारकडे आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून हिरे उद्योग अनेक अडचणींचा सामना करत आहे. रशियाकडून पुरेशा प्रमाणात कच्चा माल येत नसल्याने, सुरतचे हिरे व्यावसायिक अडचणीत आले आहे. त्यामुळे आतापर्यंत, सुरतच्या हिरे उद्योगात उत्पादन 20 टक्क्यांनी कमी झाले आहे. तर 10,000 हून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
Table of contents [Show]
कच्च्या हिऱ्यांच्या आयातीवर परिणाम
संपूर्ण गुजरातमध्ये हिरे उद्योगात तब्बल 15 लाख कामगार आहेत. तर जगात विकल्या जाणाऱ्या प्रत्येकी 10 पैकी 9 हिऱ्याला सुरत मध्ये पैलू पाडले जातात, त्याला पॉलिश केले जाते. कच्चे हिरे अख्ख्या जगाला पूरवणारा रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. रशिया -युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. याचा परिणाम कच्च्या हिऱ्यांच्या आयातीवर झाला.
हिरे उद्योगाला मोठा फटका
कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे सुरतच्या हिरे उद्योगाला मोठा फटका बसला आहे. यामुळे हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी, त्याला पॉलिश करण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या कामगारांची गरज कमी झालेली आहे. हिऱ्याच्या अनेक युनिट्सनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या मजुरांच्या कामाचे तास कमी केले आहेत. त्यामुळे कामगारांची मजुरी कमी झाली आहे आणि अनेक कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न कमी झालेला आहे.
अनेक गोष्टींच्या आयातीवर परिणाम
मुख्यत: मोठ्या आकाराच्या हिऱ्यावर सुरत शहरातचं प्रक्रिया केली जाते. भारत अमेरिकेला आतापर्यंत जवळपास 70 टक्के पॉलिश केलेले हिरे निर्यात करत होता. परंतु रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्याने, अमेरिकेने रशियन कंपन्यांवर निर्बंध लादले आहे. सुरतच्या हिरे उद्योगातील कपातीमुळे अनेक कामगारांना अनेक समस्यांना सामोर जावे लागत आहे. रशिया -युक्रेन युद्धाचा परिणाम जगभरात तेल, वायू आणि कोळशाच्या किमतींवरही झाला आहे. त्यामुळे प्रचंड महागाई वाढली असून, त्याचा परिणाम केवळ हिऱ्यांच्या खरेदीवरच नाही तर अनेक गोष्टींच्या आयातीवर झालेला आहे.
कामगारांवर अद्यापही टांगती तलवार
सुरत येथील हिरे मोठ्या प्रमाणात अमेरिका, युरोप आणि चीन येथे पाठविले जातात. दिर्घकाळापासून महागाईचा दर जास्त असल्याने या देशांमधून देखील हिऱ्याची मागणी कमी झालेली आहे. तसेच, हिऱ्याची प्रक्रिया आणि उत्पादनात कमी करुनही त्याच्या किंमतीमध्ये कसल्याही प्रकारची वाढ करता येणार नाही, कारण त्याची मागणीच कमी झालेली आहे. त्यामुळे सुरतच्या कामगारांवर अद्यापही टांगती तलवार कायम आहे. आधी कोरोनाचे संकट आणि आता जागतिक संकट यामुळे सुरतचा हिरे उद्योग प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे.