कोरोनातून सावरलेली अर्थव्यवस्था आणि दसरा दिवाळीत भारतीयांनी केलेल्या जोरदार शॉपिंगने केंद्र सरकारला बंपर लॉटरी लागली आहे. ऑक्टोबर महिन्यात सरकारला वस्तू आणि सेवा करातून तब्बल 1 लाख 51 हजार 718 कोटींचा महसूल मिळाला आहे. (GST Revenue of October 2022 was at 1,51,718 Crore) अवघ्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा सरकारला जीएसटीतून विक्रमी महसूल मिळाला.
आज 1 नोव्हेंबर 2022 रोजी अर्थ मंत्रालयाने वस्तू आणि सेवा कर महसुलाची ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी जाहीर केली.सरत्या ऑक्टोबर महिन्यात वस्तू आणि सेवा करातून सरकारला 1,51,718 कोटींचा महसूल मिळाला आहे. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये केंद्र सरकारला जीएसटीतून 1.67 लाख कोटींचा महसूल मिळाला होता. एका महिन्यात दिड लाख कोटींचा महसूल प्राप्त होणारी ही दुसरी वेळ आहे.
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर 2022 मध्ये 'सीजीएसटी'मधून (CGST) 26,039 कोटी मिळाले. 'एसजीएसटी'मधून (SGST) 33,396 कोटी आणि आयजीएसटीमधून (IGST) 81,778 कोटींचा महसूल मिळाला. अधिभारापोटी(Cess) सरकारला 10,505 कोटींचे उत्पन्न मिळाले. जीएसटीच्या ऑक्टोबरमधील आकडेवारीने भारतीयांच्या खरेदीपुढे महागाई निष्प्रभ केल्याचे दिसून आले. जीएसटीची आकडेवारी रिझर्व्ह बँकेच्या आगामी पतधोरणाच्या बैठकीमध्ये महत्वाची ठरणार आहे.
सणासुदीचा हंगाम कारखाना उत्पादन क्षेत्रासाठी सकारात्मक राहिला. एसअॅंडपी ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स ऑक्टोबर 2022 मध्ये 55.3 वर गेला. सप्टेंबरमध्ये तो 55.1 होता. कारखाना उत्पादनात होणारी वाढ, रोजगार निर्मिती, नवी गुंतवणूक या सर्व घडामोडींचा चांगला परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून आला आहे. एकीकडे जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर खुंटला असताना भारत मात्र झपाट्याने आगेकूच करत आहे. भारताचा विकास दर पुढील दोन वर्ष 6% वर राहील असे बोलले जाते.