अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून त्याचा परिणाम कर संकलनावर झाला आहे. जुलै महिन्यात वस्तू आणि सेवा करातून केंद्र सरकारला 1.65 लाखांचा कर महसूल मिळाला आहे. सलग पाचव्या महिन्यात जीसएटीचे उत्पन्न 1.5 लाख कोटींवर गेल्याने सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
अर्थ मंत्रालयाने आज मंगळवारी 1 ऑगस्ट 2023 रोजी वस्तू आणि सेवा कर महसुलाची आकडेवारी जाहीर केली. सरकारच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात 1.65 लाख कोटींचा कर मिळाला. यात 10.8% वाढ झाली. जुलैमधील जीएसटी कराचे उत्पन्न हे आतापर्यंत एका महिन्यात मिळालेले तिसरे सर्वाधिक उत्पन्न आहे.
सरकारला सेंट्रल जीएसटीमधून 29 हजार 773 कोटींचा महसूल मिळाला. स्टेट जीएसटीमधून 37 हजार 623 कोटींचा महसूल मिळाला. आयजीएसटीमधून 85 हजार 930 कोटी आणि सेसमधून 11 हजार 779 कोटी मिळाल्याचे सरकारने म्हटले आहे.
जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये जीएसटी उत्पन्नात 2.2% वाढ झाली. आर्थिक वर्ष 2023-24 च्या बजेटमध्ये सरकारने जीएसटी महसुलात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बजेटनुसार चालू वर्षात जीएसटी कर संकलनात 12% वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जुलै महिन्यात सरकारने 39 हजार 785 कोटी सेंट्रल जीएसटी आणि राज्य सरकारसाठी 33 हजार 188 कोटी राज्य सरकारांना परतावा म्हणून वितरित केले. त्यामुळे प्रत्यक्षात जीएसटीमधून सरकारला जुलै महिन्यात 69 हजार 558 कोटींचा महसूल मिळाला.
आणखी कर महसूल वाढणार
वस्तू आणि सेवा कर प्रणालीत कॅसिनो, ऑनलाईन गेम आणि अश्व शर्यतीवरील उत्पन्नावर 28% जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 जुलै 2023 रोजी जीएसटी कौन्सिलच्या मिटींगमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे जीएसटी मासिक उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
तीन वर्षात जीएसटी महसुलात झाली मोठी वाढ
देशात 1 जुलै 2017 रोजी वस्तू आणि सेवा कर लागू झाला होता. वर्ष 2017-18 या वर्षात जीएसटीचे सरासरी 1 लाख कोटींचा महसूल मिळाला होता. कोरोना काळात कर महसुलात मोठी घसरण झाली होती. मात्र मागील वर्षभरात अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारली. वर्ष 2022-23 मध्ये दर महिन्याला जीएसटीचे सरासरी उत्पन्न 1.5 लाख कोटींपर्यंत वाढले आहे.