Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

eRupee Pilot Project : ई-रुपी ग्राहकांची संख्या 10 लाखांवर जाणार; डिसेंबर अखेर भारतभर लाँच होईल डिजिटल करन्सी

eRupee Users

Image Source : www.easebuzz.in

भारतीय बाजारातून नोटा लवकरच गायब होऊ शकतात. कारण डिजिटल करन्सी ई-रुपीला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक अॅक्शन मोडमध्ये आली आहे. तब्बल 10 लाख नागरिक आणि दुकानदार प्रायोगिक तत्वावर ई-रुपी वापरतील. चाचणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण देशभरात डिजिटल करन्सी लाँच केली जाऊ शकते.

CBDC eRupee launch: केंद्र सरकार डिजिटल करन्सी म्हणजेच ई-रुपी चलनाची प्रोयोगिक तत्त्वावर (पायलट प्रोजक्ट) चाचणी घेत आहे.  या चलनास सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) असेही म्हणतात. विविध दुकानदार आणि ग्राहकांना ई-रुपी वापरण्यास दिले आहे. सुरुवातील देशभरात फक्त 5 लाख युझर्सला ई-रुपी देण्यात येणार होते. मात्र, आता 10 लाख युझर्सचा समावेश प्रायोगिक चाचणीत होणार आहे. आणि ही चाचणीही यशस्वी झाली तर डिसेंबर अखेर भारतभर ई-रुपी अधिकृतपणे लाँच होऊ शकतो. त्यामुळे लवकरच भारतीयांच्या खिशातून पैसे गायब होऊन डिजिटल स्वरुपात मोबाइलमध्ये येतील.

CBDC म्हणजे काय?

सीबीडीसी ही चलनात असलेल्या पैशांसारखेच कायदेशीर चलन आहे. डिजिटल चलनाच्या बदल्यात, RBI तुम्हाला पैशांचे व्यवहार करण्यास परवानगी देते. व्यवहारकर्ते अशा स्वरूपाचे चलन कायदेशीररित्या स्वीकारू शकतात. सोप्या भाषेत, डिजिटल चलन म्हणजे डिजिटल नोट/पैसे असे समजू शकता. हे व्यवहार करताना मध्यस्थाची किंवा पेमेंट गेटवेची गरज पडणार नाही. थेट व्यवहार होतील. तसेच हे अत्यंत सुरक्षित असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

डिसेंबर 2022 मध्ये RBI ने रिटेल मार्केटमध्ये डिजिटल रुपी (CBDC) पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता. यामध्ये 5 लाख युझर्स यामध्ये प्रामुख्याने दुकानदार आणि ग्राहकांचा समावेश करण्याचे नियोजन होते. मात्र, ही संख्या आता दुप्पट करून दहा लाख करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

ऑफलाइन ई-रूपी वापरता येणार का?

कॉइनडेस्क या संस्थेने प्रकाशित केलेल्या रिपोर्टनुसार, सध्या प्रायोगिक तत्त्वावर चाचणी करताना ग्राहक वाढवण्याबरोबरच ऑफलाइन ई-रुपी सुविधा कशी देता येईल यावरही काम सुरू आहे. म्हणजेच इंटरनेट कनेक्शन शिवाय तुम्ही डिजिटली व्यवहार करू शकता. मात्र, हे काम आव्हानात्मक असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. जर ऑफलाइन ई-रुपी बाजारात आले तर ग्रामीण भागात जेथे मोबाइल  नेटवर्क आणि इंटरनेट सुविधा नाही, अशा भागातही डिजिटल चलन पोहचेल. 

सध्या ई-रुपीचा पायलट प्रोजेक्ट 15 शहरांमध्ये सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत 1 लाख ग्राहक आणि 10 हजार दुकानदारांना समाविष्ट करून घेतले आहे. त्याद्वारे ई-रुपीचे व्यवहार व्यवस्थित होत आहेत की नाही, काही तांत्रिक अडचणी आहेत का? हे पाहिले जात आहे. मात्र, 1 लाखांच्या आसपास असलेले ग्राहक थेट दहा लाखांवर जाणार आहेत.

ई-रुपी बाजारात कधी लाँच होईल?

सध्या फक्त प्रायोगिक तत्वावर ई-रुपी वापरात असले तरी चालू वर्षाच्या शेवटपर्यंत पूर्णपणे लाँच केले जाईल. म्हणजे देशातील सर्व जनतेला आणि दुकानदारांना या डिजिटल रुपीचा वापर करता येईल. युपीआय पेमेंट आधीच भारतामध्ये यशस्वी झाल्यामुळे ई-रुपी किती यशस्वी होते हे येत्या काळात कळेल.