CBSE उडान योजना हा 2014 मध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) भारतातील मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या (MHRD) सहकार्याने सुरू केलेला एक सरकारी उपक्रम आहे. आर्थिकदृष्ट्या वंचित मुलींना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांची तयारी करण्यास मदत करण्यासाठी सरकारतर्फे त्यांना मोफत कोचिंग या योजनेद्वारे दिले जाते.
सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित वर्गातील ज्या विद्यार्थिनींना अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे परंतु त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो अशा विद्यार्थिनींना शैक्षणिक आणि आर्थिक मदत मिळावी म्हणून ही योजना सुरु करण्यात आली आहे. तांत्रिक शिक्षणातील मुलींचा सहभाग वाढवणे आणि होतकरू मुलींना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून त्यांचे सक्षमीकरण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. दरवर्षी देशभरातील 1000 विद्यार्थिनींची या योजनेसाठी निवड केली जाते. संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) आणि आयआयटी (IIT) साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत अभ्यासाचे साहित्य, कोचिंग आणि होतकरू विद्यार्थिनींच्या शिक्षणाची आणि वसतिगृहाची मोफत सोय या योजनेमार्फत केली जाते.
CBSE उडान योजनेची वैशिष्ट्ये
- या योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थिनींना देशातील कोणत्याही अभियांत्रिकी महाविद्यालयात मोफत प्रवेश दिला जातो.
- विद्यार्थिनींना अभ्यासाचे साहित्य ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध करून दिले जाते.
- ऑनलाइन पोर्टलवर अभ्यासासंबंधी अनेक प्रकारचे व्हिडिओ आणि लेखन साहित्य विद्यार्थिनींना उपलब्ध करून दिले जाते.
- योजनेत निवड झालेल्या विद्यार्थिनींसाठी भारतातील प्रमुख शहरांमधील 60 केंद्रांवर आभासी वर्ग आयोजित केले जातात.
- योजनेत निवड झालेल्या विद्यार्थिनींना अभ्यासासाठी टॅबलेट खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
- योजनेंतर्गत, विद्यार्थिनींना अभ्यासक्रमावर आधारित असाइनमेंट देखील दिल्या जातात, ज्यामुळे विद्यार्थिनींचा विकास वेळोवेळी तपासाला जातो.
- या योजनेत विद्यार्थिनींच्या अभ्यासासंबंधी शंका दूर व्हाव्यात यासाठी खास हेल्पलाइन तयार करण्यात आली आहे. ज्याद्वारे विद्यार्थिनी आपल्या शंका दूर करू शकतात.
- योजनेंतर्गत विद्यार्थिनींच्या अभ्यासातील सुधारणासंबंधी वेळोवेळी पालकांना अभिप्रायही दिला जातो.
- विद्यार्थिनींना अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेताना शासनाकडून विशेष मदत केली जाते.
- समजा एखाद्या विद्यार्थिनीने अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला असेल आणि उडान योजनेतील क्लासेसमध्ये 75% पेक्षा जास्त गुण मिळवले असतील तर अशा विद्यार्थिनींचे शिक्षण शुल्क, वसतिगृह खर्च आणि प्रवेश शुल्काच्या स्वरूपात शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.
कोण अर्ज करू शकतील?
- ही योजना केवळ भारतीय नागरिक असलेल्या विद्यार्थिनींसाठी लागू असेल.
- अर्जदार विद्यार्थिनी या देशातील कोणत्याही केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय किंवा संबंधित राज्यातील कोणत्याही सरकारी शाळेत किंवा CBSE संलग्न असलेल्या भारतातील कोणत्याही खाजगी शाळेत 11वीत शिकत असावी.
- या योजनेंतर्गत, इयत्ता अकरावी आणि बारावीच्या केवळ PCM (Physics, Chemistry and Mathematics) विषय निवडलेल्या विद्यार्थिनीच अर्ज करू शकतात.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनींना दहावीमध्ये किमान 70% आणि अकरावीला PCM विषय घेऊन 75% गुण मिळवणे अनिवार्य आहे.
- अर्जदार विद्यार्थिनीला गणित आणि विज्ञान विषयात एकूण 80% गुण असणे अनिवार्य आहे.
- या योजनेत अनुसूचित जातीतील मुलींसाठी 15% आरक्षण, अनुसूचित जमातीतील मुलींसाठी 7.5% आरक्षण, इतर मागासवर्गीय जातीतील मुलींसाठी 27% आरक्षण देण्यात आले आहे. सोबतच दिव्यांग विद्यार्थिनींना 3% आरक्षण दिले गेले आहे.
- तसेच अर्जदार मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त नसावे.
CBSE उडान योजनेत अर्ज करण्याची प्रक्रिया
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी केवळ CBSE उडान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .यानंतर तुम्हाला पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 4 चरणांमधून जावे लागेल. त्यानंतर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
- आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी पर्यायावर क्लिक करावे लागेल .
- आता अर्जात मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. चुकीची माहिती भरल्यास तुम्हाला संभाव्य अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तो टाळण्यासाठी सर्व माहिती बारकाईने भरा.
- आता तुम्हाला या अर्जात विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि सबमिट वर क्लिक करा.
- एकदा सबमिट केल्यावर, तुम्हाला एक नोंदणी क्रमांक प्राप्त होईल जो तुम्ही जतन करणे आवश्यक आहे. या नोंदणी क्रमांकावरूनच तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकाल.
- तुम्ही भरलेला अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्या. अशा प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज सहज करू शकता.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            