Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Literacy: तरूणाई पॉकेट मनीचा वापर कसा करते; सेव्हिंग आणि इन्वेस्टमेंटबद्दल त्यांचे मत काय?

Financial Literacy: तरूणाई पॉकेट मनीचा वापर कसा करते; सेव्हिंग आणि इन्वेस्टमेंटबद्दल त्यांचे मत काय?

Financial Literacy: आर्थिक साक्षरतेचा मुद्दा लक्षात घेऊन आजची तरुण पिढी त्यांना मिळालेल्या पॉकेट मनीचा वापर कशाप्रकारे करते. बचत आणि गुंतवणुकीबाबत त्यांचे काय मत आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

आजच्या तरुण पिढीला पैशांचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार कसे करावेत याची योग्य माहिती घेऊन निर्णयक्षमता विकसित होण्याची गरज आजच्या पिढीसाठी उपयुक्त ठरू शकते. पैशांचा वापर कसा करावा, पैसे कुठे आणि किती खर्च करावेत याचे ज्ञान जर तरुणाईला नसेल तर भविष्यात आर्थिक चणचण येऊ शकते. आपल्याकडे असणाऱ्या पैशांचे योग्यरीत्या नियोजन करणे तसेच उपलब्ध असलेली रक्कम हाताळण्याची क्षमता म्हणजे आर्थिक साक्षरता होय. आर्थिक शिक्षणामुळे गुंतवणूक, बजेट आणि निवृत्तीनंतरचे बचतीचे गणित सोपे होऊ शकते. भविष्यातील ध्येयप्राप्तीसाठी तरुणाईने आर्थिक शिक्षण घेऊन गुंतवणूक केली पाहिजे. तसेच, खर्चाची आखणी करून बजेट ठरवले पाहिजे. त्यामुळे जास्तीच्या खर्चातून पैसे वाचू शकतात.

आर्थिक व्यवहारात पैसा म्हणजे वस्तू आणि सेवा यांची देवाण-घेवाण करण्यासाठी वापरले जाणारे माध्यम आहे. इच्छा आणि गरजा याची पूर्तता करण्यासाठी ज्या वस्तूंची आवश्यकता आहे त्या घेण्यासाठी पैसा महत्त्वाचा दुवा ठरतो. पैशांच्या मदतीने हव्या त्या वस्तूंची खरेदी करता येते, त्यामुळे पैशांना अनन्यसाधारण महत्त्व लाभले आहे. शिक्षण करण्याच्यावेळी पैसे असतील तर अनेक मार्ग उपलब्ध होतात. शिक्षणासाठी येणाऱ्या खर्चानुसार करियर मार्ग निवडण्याचा निर्णय अनेक विद्यार्थी घेत असतात.

बचत, गुंतवणूक, खर्च, देणे

डिजिटल साक्षरतेचा विषय संगणक साक्षरता आणि माहिती साक्षरता या संकल्पनांवर आधारित आहे. आजची तरुणाई डिजिटली अपडेटेट असल्यामुळे सुरक्षा आणि प्रायव्हसीचे काटेकोर नियम लक्षात घेऊन सरकारने डिजिटल साक्षरता आणि मानसिक आरोग्यासाठी गुंतवणूक करावी, अशी अपेक्षा तरुण पिढी सरकारकडे करत आहे. स्थलांतराचा प्रश्न कमी करण्यासाठी रोजगार निर्मिती तसेच नोकरीच्या संधी निर्माण होऊन त्यानुसार कायदे येणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा तरुणाईकडून केली जात आहे. 

आर्थिक साक्षरतेचा मुद्दा लक्षात घेऊन आजची तरुण पिढी त्यांना मिळालेल्या पॉकेट मनीचा वापर कशाप्रकारे करते, बचत आणि गुंतवणुकीबाबत त्यांचे काय मत आहे याबद्दल माहिती घेतली असता काही तरूणांनी नाव न सांगण्याच्या अटीवर खालीलप्रमाणे उत्तरे दिली.

कॉलेजमध्ये शिक्षण सुरु असताना कुटुंबासोबत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पैशांची गरज कमी लागते. 60% पैसे पुस्तके, शैक्षणिक सामग्री आणि कधी फ्रेंड्ससोबत बाहेर गेल्यावर खर्च व्हायचे. 15% पैसे कॉलेज ते घरी जाण्याच्या प्रवासात खर्च व्हायचे आणि उरलेल्या पैशांची बचत व्हायची, असे सोमय्या कॉलेजच्या विद्यार्थ्याने सांगितले. जेवण-कपडे या महत्त्वाच्या गरजा सोडल्या तर मला माझ्या आवडीच्या गोष्टींवर पैसे खर्च करायला आवडतील. जर मी कमावत असेल तर मला कला क्षेत्रातील गोष्टी बघायला आणि त्या ठिकाणी भेट द्यायला आवडेल, असे मत 12 वीच्या विद्यार्थिनीने व्यक्त केले.

पैसे गुंतवणे खूप महत्वाचे आहे. प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी आपला पैसा शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा बाँडमध्ये गुंतवतो. माझ्या वयाचा विचार करता, ही अशी वेळ आहे जेव्हा मी जोखीम पत्करू शकतो आणि म्हणून बाजूला ठेवलेल्या पैशासह, मी माझा बहुतांश पैसा शेअर बाजारात गुंतवतो. रिअल इस्टेट, सरकारी योजना आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याबाबत आणि विशिष्ट वयानंतर बाँडमध्येही गुंतवणूक करण्याचा माझा सकारात्मक विचार आहे, असे शिकत नोकरी करणाऱ्या तरुणाने सांगितले.

मला उत्सुकता असली तरी, बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान सध्या माझ्याकडे नाही. मला स्टॉक मार्केटमध्ये रस आहे, म्हणून मी माझ्या वडिलांकडून गुंतवणूक आणि बचत करण्याबद्दल जाणून घेत असून कोर्स मधून माहिती घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे एका तरुणीने सांगितले. मला वाटते की पैसे वाचवणे महत्त्वाचे आहे कारण, ते तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अनपेक्षित खर्चांसाठी उपयोगी पडू शकतात.सहसा, माझे काही पैसे माझ्या मित्र किंवा कुटुंबासाठी भेटवस्तूंवर खर्च केले जात असल्याचे एका मास्टर्स करणाऱ्या तरुणीने सांगितले.

अशाप्रकारे, आजच्या तरुणाईला बचत, गुंतवणूक आणि त्यातील विविध गोष्टींबद्दल उत्सुकता असून भविष्यात बचतीचे मार्ग स्वीकारून गुंतवणूक करण्याची इच्छा असल्याचे संशोधनातून समोर आले.