महाराष्ट्र सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाद्वारे मागासवर्गाच्या उन्नतीसाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. महामंडळाच्या या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकता. तुम्ही महामंडळाच्या योजनांचा कशाप्रकारे लाभ घेऊ शकता, याविषयी जाणून घेऊयात.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची माहिती
महाराष्ट्र सरकारने 1978 मध्ये या महामंडळाच्या स्थापना केली. महामंडळाचा उद्देश हा अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील आर्थिक दृष्टया दुर्बल आणि मागासवर्गाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा आहे. महामंडळामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनेंतर्गत 50 हजार रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाते.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या प्रमुख योजना
कर्ज अनुदान योजना | महामंडळाद्वारे राबवण्यात येणाऱ्या कर्ज अनुदान योजनेंतर्गत 20 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाते. यामध्ये बँकेकडून 50 टक्के रक्कम, तर महामंडळाकडून 50 टक्के अनुदान दिले जाते. |
बीज भांडवल योजना | स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असल्यास महामंडळाच्या या योजनेचा लाभ घेऊ शकता. योजनेंतर्गत 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाते. ज्या व्यवसायात 5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाते, अशा व्यवसायाचा या योजनेंतर्गत भांडवल देताना विचार केला जातो. |
थेट कर्ज योजना | महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाद्वारे थेट कर्ज योजना राबवली जाते. या अंतर्गत 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षात याची परतफेड करणे गरजेचे आहे. तसेच, नियमित व्याजदरापेक्षा या कर्जावरील व्याजदर हा खूपच कमी आहे. |
प्रशिक्षण योजना | महामंडळाद्वारे विद्यार्थ्यांना स्वंयरोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देखील दिले जाते. यामध्ये वाहनचालक, टी.व्ही.व्हीडीओ, रेडीओ दुरुस्ती, टेलरिंग, वेल्डींग, फिटर, कॉम्प्युटरशी संबंधित प्रशिक्षण दिले जाते. ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांना महिन्याला 1 हजार रुपये वेतन देखील दिले जाते. |
अर्ज कुठे करता येईल?
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी पुरावा, व्यवसायाशी संबंधित इतर कागदपत्रे असणे आवश्य आहे. तुम्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयाकडे अर्ज करू शकता.