भारत आयटी क्षेत्रामध्ये झपाट्याने प्रगती करत आहे. त्यामुळे जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मोठमोठ्या कंपन्या भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. पंतप्रधान मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात Googleचे सीईओ सुंदर पिचाई आणि अॅमेझॉन (Amazon)चे सीईओ अँड्र्यू जॅसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीदरम्यान गुगल आणि अॅमेझॉन दोन्ही कंपन्यांनी भारतातील गुंतवणुकी बाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.
ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर : Global Fintech Operation Center
गुगल (Google) या मल्टीनॅशन कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. गुगल गुजरातमध्ये (Gujarat)आपले ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर (Global Fintech Operation Center) सुरू करणार आहे. गुजरातमधील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक (Gujarat international finance Tech GIFT) सिटीमध्ये हे सेंटर सुरू केले जाणार आहे. सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांनी शुक्रवारी याबाबतची घोषणा केली. त्याच बरोबर गुगलकडून भारतात 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचेही पिचाईंनी जाहीर केले.
पिचाई यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीबाबत बोलताना पिचाई म्हणाले की, डिजिटल इंडियासाठी पंतप्रधानांची दूरदृष्टी ही काळाच्या पुढे आहे. भारतातील डिजिटल मोहीम ही एक ब्लू प्रिंट आहे जी इतर देश स्वीकारू पाहत आहेत.
गुगल करणार 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक : Google investments in India
Google कंपनी येत्या पाच ते सात वर्षांमध्ये भारतात 10 अब्ज डॉलर (82 हजार कोटी) गुंतवणार आहे. याबाबत बोलताना पिचाई म्हणाले की, यापूर्वी डिसेंबरमध्ये मोदींची भेट झाली होती. त्यानंतर आम्ही पुढे चर्चा चालू ठेवली आणि आता आम्ही भारताच्या डिजिटायजेशन फंडामध्ये 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहोत. यामध्ये आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहोत. त्याअंतर्गत आम्ही 100 भाषांमध्ये बॉटची सेवा आणण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. लवकरच आम्ही भारतीय भाषांमध्ये देखील 'बॉट' सुरू करणार असल्याचेही पिचाई यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींनी पिचाई यांच्यासोबत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), फिनटेक आणि सायबर सुरक्षा उत्पादने आणि सेवा तसेच भारतातील मोबाईल उपकरण निर्मिती क्षेत्रात सहकार्याबाबत चर्चा केली होती.
अॅमेझॉन करणार 26 बिलियन डॉलरची गुंतवणूक- Amazon investments in India
त्याचप्रमाणे अॅमेझॉनचे CEO अँड्र्यू जॅसी यांनी प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी भारतात 26 बिलियन डॉलर (2.1 लाख कोटी) गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले की अॅमेझॉन जगभरातील सर्वात मोठ्या गुतंवणूकदारा पैकी एक कंपनी आहे. आम्ही आत्तापर्यंत 11 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. यापुढे आणखी 15 बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याचे नियोजन आहे. अशा प्रकारे अॅमेझॉन भारतात एकूण 26 बिलियन डॉलर ची भारतामध्ये गुंतवणूक करेल. तसेच या गुंतवणुकीच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि लहान मोठ्या व्यवसांना डिजिटल व्यवसायाचे स्वरूप देण्यास मदत होईल. याच बरोबरआम्ही भारतीय उत्पादने जगभरात निर्यात करण्यास आणखी मदत करू असेही जॅसी म्हणाले.