Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GoMechanic: गोमेकॅनिकच्या खात्यांमध्ये आर्थिक त्रुटी, होणार फॉरेन्सिक ऑडिट!

Financial misreporting by GoMechanic

Image Source : www.livemint.com

GoMechanic: गोमेकॅनिक कंपनीने नुकतेच त्यांच्या 70 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन (lays off 70% staff) काढून टाकले आहे. ज्यामुळे कंपनीबाबत सर्वत्र चर्चा होत आहे, यावेळी कंपनीचे को-फाऊंडर अमित भसीन यांनी कंपनीच्या आर्थिक व्यवहारांच्या लेख्याजोख्यात गडबड झाल्याचे मान्य केले आहे, तर नेमके प्रकरण काय ते समजून घेऊयात.

GoMechanic founder admits to financial reporting errors: ऑटोमोबाईल विक्रीनंतर दुरुस्ती आणि देखभालीची सेवा देणारे  स्टार्टअप गो मेकॅनिक (GoMechanic) ही कंपनी मोठ्या संकटात सापडली आहे. कंपनीने आपल्या 70 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, तर उर्वरित 30 टक्के कर्मचाऱ्यांना पुढील तीन महिने वेतनाशिवाय काम करण्यास सांगितले आहे. गो मेकॅनिकचे सह-संस्थापक (Co-founder) अमित भसीन यांनी कंपनीच्या जमा - खर्चाच्या हिशेबात फेरफार झाल्याची कबुली दिली. तर, कंपनीची जलद प्रगतीच्या गतीत वाहवत गेल्याचे भसीन यांनी म्हटले. गोमेकॅनिकमध्ये पैसे गुंतवणाऱ्या सर्व बड्या गुंतवणूकदारांनी मिळून कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. कपातीच्या घोषणेमुळे आणि पगार न मिळाल्याने कंपनीतील 1 हजार कर्मचाऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

लिंक्डइनवर व्यक्त केली दिलगिरी (Bhasin apologized on LinkedIn)

गो मेकॅनिकचे (GoMechanic) सह-संस्थापक अमित भसीन यांनी लिंक्डइन (Linkedin) वर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कंपनीचे संस्थापक विकासाच्या संधी शोधण्यात 'विचलित' होते. भसीनने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आम्ही या क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्याच्या आणि भांडवलाची व्यवस्था करण्याच्या आमच्या उत्कटतेने चूक केली. आम्हाला कोणत्याही किंमतीत वाढ कायम ठेवायची होती आणि या प्रक्रियेत आम्ही आर्थिक अहवालातील चुकांसह चुकीचे निर्णय घेतले. याबद्दल आम्ही मनापासून दिलगीर व्यक्त करतो. तथापि, भसीन यांनी आपल्या पोस्टमध्ये कंपनीच्या आर्थिक अहवालात कोणत्या प्रकारच्या चुका केल्या आहेत याची माहिती दिलेली नाही.

अमित भसीन यांनी पुढे लिहिले की, सध्याच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी घेत आम्ही सर्वानुमते व्यवसायाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भांडवलाच्या समस्येवरही आम्ही उपाय शोधत आहोत. ही पुनर्रचना वेदनादायक असणार आहे आणि दुर्दैवाने आम्हाला आमच्या सुमारे 70 टक्के कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकावे लागेल. याशिवाय एक थर्ड पार्टी फर्म संपूर्ण व्यवसायाचे ऑडिट केले जाणार आहे. गो मेकॅनिक अशा योजनेवर काम करत आहे, जी सध्याच्या परिस्थितीत सर्वात व्यावहारिक असू शकते. यासोबतच त्यांनी असा दावाही केला आहे की, कंपनीच्या संस्थापकांनी अशा परिस्थितीची कल्पनाही केली नव्हती.

गुंतवणूकदारांनी केली फॉरेन्सिक ऑडिटची घोषणा (Forensic Audit)

तब्बल दोन वर्षांनंतर कंपनीच्या खात्यांमध्ये हेराफेरी झाल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या सद्यस्थितीबाबत, प्रमुख गुंतवणूकदारांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “गो मेकॅनिकच्या गुंतवणूकदारांना अलीकडेच कंपनीच्या संस्थापकांच्या आर्थिक अहवालातील गंभीर विसंगतींची जाणीव झाली आहे. संस्थापकांनी जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्याने आम्हाला अत्यंत धक्का बसला आहे. कंपनीच्या संस्थापकांनी मान्य केले आहे की या चुकीच्या माहितीमध्ये महसूल अतिशयोक्तीचाही समावेश आहे. गुंतवणूकदारांनी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सर्व गुंतवणूकदारांनी मिळून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रयस्थ कंपनीची नियुक्ती केली आहे आणि या संदर्भात पुढील कोणतीही पावले सर्व गुंतवणूकदार एकत्रितपणे उचलतील. हरियाणातील या गुडगावस्थित कंपनीवर सध्या सुमारे 120  कोटी रुपयांचे कर्ज आहे, तर सुमारे एक तृतीयांश रकमेची परतफेड बाकी आहे.

जून 2021 मध्ये, गोमेकॅनिकने सीरीज सी फंडिंग अंतर्गत अनेक मोठ्या गुंतवणूकदारांकडून 42 दशलक्ष युएस डॉलर म्हणजे सुमारे 341 कोटी जमा केले. स्टार्टअपच्या गुंतवणूकदारांमध्ये सेक्वॉया कॅपिटल, टायगर ग्लोबल, ओरिओस व्हेंचर पार्टनर्स आणि चिराते व्हेंचर्स यांचा समावेश आहे.

गोमेकॅनिकची सुरुवात...

अमित भसीन, कुशल कर्वा, नितीन राणा आणि ऋषभ करवा यांच्यासोबत, ऑटोमोबाईल दुरुस्ती स्टार्टअप म्हणून 2016 मध्ये गो मेकॅनिकची (GoMechanic) स्थापना केली. कार मालकांना त्यांच्या क्षेत्रातील कार दुरुस्ती करणार्‍यांशी जोडणे हा कंपनीचा उद्देश होता. याशिवाय, कंपनी आपल्या वेबसाइट आणि अॅपद्वारे मूळ ऑटो स्पेअर पार्ट्स आणि अॅक्सेसरीज विकत आहे.