कोरोना रोखण्यासाठी लागू केलेल निर्बंध शिथिल झाल्यानंतर सोने तस्करीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. महसूल गुप्तचर महासंचनालयाच्या (Directorate of Revenue Intelligence) ताज्या अहवालानुसार 2021-22 या वर्षात सोने तस्करीच्या 160 घटना उघडकीस आल्या आहेत. यात 833 किलो सोने जप्त करण्यात आले असून याचे मूल्य 405.35 कोटी इतके आहे.
सोने तस्करी वाढत असल्याबाबत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी चिंता व्यक्त केली. महसूल गुप्तचर महासंचनालयाच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सितारामन बोलत होत्या. सितारामन यांच्या हस्ते वर्ष 2021-22 चा अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. त्या म्हणाल्या कि कोव्हीड निर्बंध शिथिल केल्यानंतर सोने तस्करीत वाढ होणे याचा अर्थ सोने आयात आणि तस्करी यांचा परस्पर संबध आहे. मार्च 2021 आणि ऑगस्ट 2021 या महिन्यात सोने आयात प्रचंड वाढली होती. त्यापाठोपाठ ऑक्टोबर महिन्यात तस्करीची 25 प्रकरणांचा तपास यंत्रणांनी छडा लावला होता. यात 90.25 किलो सोने जप्त करण्यात आले होते.
यात धक्कादायक बाब म्हणजे तस्करांनी म्यानमार देशांचा वापर केला आहे. वर्ष 2020-21 आणि 2021-22 या दोन वर्षात पकडण्यात आलेल्या सोने तस्करींमध्ये म्यानमार देशांतून आलेल्या तस्करांचे प्रणाम जास्त होते. त्याआधीच्या वर्षात आखाती देशांमधून सोने तस्करी होत होती.
सोनेच नव्हे तर ई सिगरेट्स, मोबाईल फोन्सची तस्करी
कोरोना काळात मोबाईल फोन्स, ई-सिगारेट्स या वस्तूंची देखील प्रचंड तस्करी झाल्याचे महसूल गुप्तचर विभागाच्या अहवालात म्हटले आहे. कोरोना काळात पोस्ट ऑफिसने कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीची सेवा सुरु केली होती. या सेवाचा गैरफायदा घेत मोबाईल फोन, ई-सिगारेट्सची तस्करी झाल्याचे दिसून आले.
नोकरी गेल्याने तस्करीचा मार्ग स्वीकारला
कोरोना काळात लाखो रोजगार बुडाले होते.आखाती देशांत काम करणाऱ्या हजारो भारतीयांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या.हे सर्व भारतीय मायदेशी परतण्यासाठी प्रयत्न करत होते. यातील काहींनी सोने तस्करीसाठी काम केल्याचे दिसून आले आहे.या कामगारांच्या अडचणीचा फायदा तस्करीतील काही एजंट्सनी घेतला आणि त्यांच्याकडून सोन्याचे स्मगलिंग केले. 2021-22 या वर्षात अशा अनेक प्रकरणांमध्ये ही पद्धत वापरल्याचे उघड झाले.