आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे परिणाम आज भारतातील कमॉडिटी मार्केटवर उमटले. आज मंगळवारी 3 जानेवारी 2023 रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमला 55546 रुपये इतका वाढला. मागील दोन वर्षांतील सोन्याचा हा उच्चांकी दर आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा दर 0.8% ने वाढला आणि तो 1838.69 डॉलर इतका वाढला.
जागतिक पातळीवर मंदीचे वातावरण आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. त्यापार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने पर्याय निवडला आहे. मागील आठवडाभरात सोन्याची मागणी वाढल्याचे दिसून आली. त्याशिवाय इतर चलनांच्या तुलनेत डॉलरचे मूल्य देखील वाढले आहे. परिणामी सोन्याचा भाव वाढत असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे.
सेंट्रल बँकांची व्याजदर वाढ, मंदी आणि महागाईचा प्रभाव पाहता वर्ष 2023 सोने आणि चांदीसाठी चांगले ठरणार असल्याचे मेहता इक्विटीजचे गुंतवणूक विश्लेषक राहुल कलंत्री यांनी सांगितले. डिसेंबर 2022 मध्ये सोन्याचा भाव 1822 डॉलर इतका वाढला होता. आज सोन्याचा भाव 1838.69 डॉलर असून चांदीचा भाव 24.25 डॉलर इतका आहे.
आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याचा भाव 55800 रुपयांपर्यंत वाढला. त्यात सोमवारच्या तुलनेत 341 रुपयांची वाढ झाली. आज चांदीचा भाव एक किलोला 70610 रुपये इतका वाढला आहे. त्यात 1040 रुपयांची वाढ झाली. मुंबई आणि कोलकाता सराफा बाजारात आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55580 रुपये इतका होता. दिल्लीमध्ये 55730 रुपये आणि चेन्नईत 56630 रुपये इतका आहे. मुंबई, कोलकाता दिल्ली आणि चेन्नईमध्ये 22 कॅरेटचा भाव अनुक्रमे 50950 रुपये, 50950 रुपये, 51100 रुपये आणि 51910 रुपये इतका आहे.