जागतिक पातळीवरील अस्थिरतेने पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून गुंतणूकदारांनी सोन्याकडे धाव घेतली आहे. यामुळे आज गुरुवारी 4 मे 2023 रोजी कमॉडिटी मार्केटमध्ये सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 61490 रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेला. जागतिक पातळीवर सोन्याचा भाव प्रती औंस 2081 डॉलरच्या उच्चांकी पातळीवर गेला होता. सोन्याचा भाव रेकॉर्ड स्तरावर गेल्यावर मागणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
गेल्या महिनाभरात सोन्याच्या किंमतीत मोठी उलथापालथ दिसून आली होती. वाढती महागाई, सेंट्रल बँकांची व्याजदर वाढ आणि शेअर मार्केटमधील अस्थिरता, अमेरिका-युरोपातील मंदी अशा घटकांमुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या देखील गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीकडे ओघ वाढला असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे.
आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) 525 रुपयांनी वाढला. सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 61490 रुपये इतका झाला. बुधवारी 3 मे रोजी सोन्याचा भाव 61200 रुपयांवर बंद झाला होता. त्यात 955 रुपयांची वाढ झाली होती. सोन्याबरोबरच एमसीएक्सवर चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव 77450 रुपये इतका वाढला आहे. त्यात 868 रुपयांची वाढ झाली.
अमेरिकेची सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीचे सत्र थांबवण्याचे संकेत दिले आहेत. त्याचे पडसाद कमॉडिटी मार्केटवर उमटले.वर्ल्ड मार्केटमध्ये सोन्याचा भाव 2081.80 डॉलर प्रती औंस इतका वाढला होता. डॉलर इंडेक्समधील घसरण सोन्याचा भाव वाढवण्यास कारणीभूत ठरली. डॉलर इंडेक्स 101 च्या पातळीवर आला आहे. तसेच बॉंड यिल्डवरील दबाव कायम असल्याने सोने दर वाढण्यास पोषक वातावरण असल्याचे अॅक्सिस सिक्युरिटीजचे मुख्य संशोधक देवेया गगलानी यांनी सांगितले.
रशिया आणि युक्रेन युद्ध अद्याप शमलेले नाही. त्यातच बुधवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला करण्यात आल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. यामुळे जागतिक पातळीवर अनिश्चिततेत भर पडली. नजीकच्या काळात वर्ल्ड मार्केटमध्ये सोने 2005 ते 2050 डॉलर या दरम्यान राहील, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
वार्षिक आधारावर सोन्याने दिला 10.78% रिटर्न
मागील वर्षभरात सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. वर्षभरात सोन्याने 10.78% रिटर्न दिला आहे.वर्षभरात सोने 5928 रुपयांनी महागले. चांदीने सोन्याप्रमाणे 10% परतावा दिला आहे. वर्षभरात चांदीमध्ये 7232 रुयांची वाढ झाली. जानेवारीपासून चांदीचा भाव 2447 रुपयांनी वाढला आहे.