भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला लक्ष्मीचे स्थान देण्यात आले आहे. अनेक महत्त्वाच्या आणि शुभ प्रसंगी सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. अगदी दोन दिवसांवर अक्षय्य तृतीया हा सण आला असून, साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या सणाला भारतीय लोक आवर्जुन सोने खरेदी करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारपेठेत सोन्याचा दर 60 हजारांवर गेला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत सोने खरेदी करणे सर्वसामान्य लोकांना महागात पडू शकते. पण आता काळजी करण्याची गरज नाही. प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी तुम्ही तुमच्या बजेटमध्ये सोन्यात गुंतवणूक करू शकता. त्यासाठीचे गुंतवणुकीचे विविध पर्याय आपण जाणून घेणार आहोत.
भारतीय सराफा बाजारात सोन्याचा दर हा 60 हजारांच्या वर गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला प्रत्यक्ष सोने खरेदी करणे महागले आहे. त्यात महागाईचे सावट असल्याने पैसे खर्च करताना विचार करावा लागत आहे. त्यामुळे परवडेल आणि बजेटमध्ये बसेल असे गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्हालाही सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड (SGB), गोल्ड ईटीएफ (Gold Exchange Traded Fund - ETF), म्युच्युअल फंड आणि डिजिटल गोल्डच्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करता येऊ शकते.
Table of contents [Show]
सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड (Sovereign Gold Bond)
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड (Sovereign Gold Bond) ही योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरु केली. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. या माध्यमातून तुम्ही प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी बॉण्ड स्वरुपात खरेदी करू शकता. आरबीआय हे बॉण्ड जारी करत असून यामध्ये गुंतवलेल्या पैशाची हमी देखील सरकारच घेते. ही योजना सरकारी असल्याने सुरक्षित आहे. यामधील बॉण्डची किंमत आरबीआय जाहीर करत असते. या बॉण्डचा कालावधी 8 वर्षांचा असतो. त्यानंतर ते मॅच्युअर होतात.
हे बॉण्ड तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकता. बँकांच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमधून आणि RBI च्या वेबसाईटवरून विकत घेऊ शकता. जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने बॉण्ड्स विकत घ्यायचे असतील, तर बँक आणि पोस्टाच्या माध्यमातून खरेदी करू शकता.
गोल्ड ईटीएफ (Gold ETF)
गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) हा म्युच्युअल फंडचाच एक प्रकार आहे. याची खरेदी-विक्री ही डिमॅट अकाउंटच्या माध्यमातून करता येते. शेअर मार्केटमधील इंटेक्समधून याची दररोज खरेदी-विक्री होत असते. गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करून सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतात.
गोल्ड म्युच्युअल फंड (Gold Mutual Fund)
आजकाल बरेच जण म्युच्युअल फंडमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवत आहेत. म्युच्युअल फंडमध्ये विविध सेक्टरनुसार गुंतवणूक केली जाते. त्याप्रमाणे गोल्ड फंड (Gold Fund) नावाने देखील म्युच्युअल फंड तयार करण्यात आले आहेत. यामध्ये गुंतवणूकदार केवळ 500 रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात. सर्वसामान्य लोकांसाठी हा परवडणारा गुंतवणूक पर्याय ठरत आहेत. सध्या गुंतवणूक करणाऱ्या बऱ्याच कंपन्या गोल्ड फंड क्षेत्रात काम करत आहेत. या कंपन्या गुंतवणूकदारांचा पैसा योग्य गोल्ड फंडामध्ये गुंतवतात. बाजारातील चढ-उतारानुसार गुंतवणूकदारांना त्यातून परतावा मिळतो. महत्वाचे म्हणजे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षासाठी पैसे गुंतवले आणि त्याला पैशांची आवश्यकता लागली. तर गुंतवणूकदार त्यातून बाहेर पडू शकतो.
डिजिटल गोल्ड (Digital Gold)
डिजिटल गोल्ड हा देखील सोन्यामध्ये गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा पर्याय आहे. या अंतर्गत गुंतवणूकदार ऑनलाईन सोने खरेदी करू शकतात. जे डिजिटल वॉलेटमध्ये ठेवता येते. यातील सोन्याच्या गुंतवणुकीवर खरेदीदाराला जीएसटी (GST) भरावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे या सोन्याच्या खरेदीवर मेकिंग चार्जेस लागू होत नाही.
डिजिटल गोल्ड मोबाईल आणि लॅपटॉपवरून खरेदी करता येऊ शकते. सध्या मार्केटमध्ये पेटीएम (Pay-Tm), गुगल पे (Google Pay), फोन पे (Phone Pay) या ॲपद्वारे डिजिटल गोल्ड खरेदी करता येते. पण याला सेबीने अधिकृत मान्यता दिलेली नाही. एनएसई आणि सेबीने अशापद्धतीने डिजिटल सोन्याची खरेदी-विक्री करणाऱ्या कंपन्यांना ही सुविधा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
भारतात अधिकृतरीत्या तीन कंपन्या डिजिटल गोल्डच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात. ज्यामध्ये एमएमटीसी लिमिटेड (MMTC Limited), स्विस फर्म एमकेएस पीएएमपी (Swiss firm MKS PAMP) आणि ऑगमेंट गोल्ड लिमिटेड (Augment Gold Limited) या कंपन्यांचा समावेश आहे.