एकीकडे अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याने विक्रमी पातळी गाठली आहे. बुधवारी 24 कॅरेट सोन्याने सुमारे एक हजार रुपयांच्या वाढीसह 58,470 हजार रुपये प्रति तोळा ही विक्रमी पातळी ओलांडली आहे. एवढेच नाही तर चांदीच्या दरातही 1350 रुपयांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती आणि भारतात अर्थसंकल्प सादर केल्यानंतर वाढवलेले आयात शुल्क यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीवर परिणाम झाला आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 58,470 हजार रुपयांच्या वर पोहोचला आहे. आणि 22 कॅरेटच्या एक तोळ्याची किंमत सुमारे 53,600 हजार रुपये आहे. तसेच 18 कॅरेट सोन्याचा दर 49 हजार रुपयांवर तर 14 कॅरेट सोन्याचा दर 40 हजार रुपयांवर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात याच गतीने वाढ होत राहील.
सोने 60 हजारांच्या पुढे जाऊ शकते
सध्याची परिस्थिती पाहता 24 कॅरेट सोने कोणत्याही क्षणी प्रति तोळा 60 हजार रुपयांची पातळी ओलांडू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी तीन प्रमुख कारणे दिली जात आहेत. पहिले कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची घसरणहोणे, दुसरे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या उत्पादनात झालेली घट आणि तिसरे म्हणजे जगातील विविध देश सातत्याने अनेक टन सोने खरेदी करून त्यांच्या सोन्याच्या साठ्यात वाढ करत आहेत.
भारतात सोन्याला मोठी मागणी!
भारतात वर्षाची बारा महिने सोन्याला मागणी असते. भारतीय सामान्य माणूस सोन्यात गुंतवणूक करणे पसंत करतो. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे, त्यामुळे सोने खरेदीसाठी लोक सराफा बाजारात गर्दी करत आहेत. वाढत्या मागणीमुळे देखील सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. भारतात सोन्याच्या खाणी नाहीत. भारतात सोने इतर देशांमधून आयात केले जाते. सोने खरेदीसाठी भारताला इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. यंदाच्या अर्थसंकल्पात सोने आयातीवरील कर वाढविल्यामुळे सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.