आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सोन्याच्या किंमतीनी भारतीय बाजारात आगेकूच कायम ठेवली आहे. शुक्रवारी 6 जानेवारी 2023 रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 500 रुपयांनी वाढला. सोन्याचा दर 55790 रुपयांच्या पातळीवर गेला. सोन्याबरोबरच चांदीच्या किंमतीत देखील मोठी वाढ दिसून आली. कालच्या सत्रात चांदी 1100 रुपयांनी महागली. एक किलो चांदीचा भाव 69178 रुपये इतका वाढला होता. (Gold and Silver Price Rise Continue in MCX)
मागील दोन आठवडे सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. काल एमसीएक्सवर सोन्याचा दर प्रती 10 ग्रॅमचा भाव 55730 रुपयांवर स्थिरावला होता. एक किलो चांदीचा भाव 69178 रुपयांवर बंद झाला. त्यात 1100 रुपयांची वाढ झाली. इंट्राडेमध्ये सोन्याचा दर 55790 रुपयांवर गेला तर चांदीचा भाव 69289 रुपये इतका वाढला होता.
Goodreturns या वेबसाईचनुसार आज शनिवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 51300 रुपये इतका वाढला आहे. त्यात 400 रुपयांची वाढ झाली. 24 कॅरेटचा भाव 55960 रुपये इतका वाढला. त्यात 430 रुपयांची वाढ झाली. दिल्लीत 22 कॅरेट सोने दर 51450 रुपये असून 24 कॅरेटचा भाव 56110 रुपये इतका आहे. चेन्नईत 22 कॅरेट सोने दर 52210 रुपये असून 24 कॅरेटचा भाव 56960 रुपये इतका आहे. कोलकात्यात 22 कॅरेट सोने दर 51300 रुपये असून 24 कॅरेटचा भाव 55960 रुपये इतका वाढला आहे.
सोन्यावर आयात शुल्क आणि जीएसटी लागू होते. त्याशिवाय तयार दागिने घेतले तर त्यावर सराफांकडून घडणावळ देखील आकारली जाते. तयार दागिन्यांचा दर हा प्रत्येक व्यापाऱ्याकडे वेगवेगळा असतो. आजच्या घडीला 10 ग्रॅम सोन्याचा दागिना सर्व कर आणि शुल्कांसहित हा 57000 ते 58000 रुपयांच्या दरम्यान आहे.