शेत मालाचे भाव वाढल्याने सर्व सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. जवळपास 15 दिवसांपासून स्वयंपाक घरातून टोमॅटो हद्दपार झाल्यात जमा असताना आता अद्रकाच्या दरवाढीने नागरिकांना झटका दिला आहे. अद्रकाचे भाव किलोला 220 रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात सर्वसामान्यांना अद्रकाच्या चहाच्या चवीला मुकावे लागत आहे. इतकेच नाही तर कोल्हापुरात चहाच्या टपरीवर अद्रकाच्या चहाचे दर 4 ते 5 रुपयांनी वाढवले आहेत.
चहातून अद्रक हद्दपार
सध्या पावसाळा सुरु असल्याने घरोघरो अद्रकाच्या चहाचा स्वाद घेण्यास पसंती दिली जाते. मात्र, अद्रकाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कर्नाटक, केरळमध्ये सध्या अद्रक 300 रुपये किलोने विकले जात आहे. तर भारताच्या इतर भागांमध्ये 220 ते 250 प्रति किलो रुपये दर पोहोचला आहे. परिणामी या दरवाढीमुळे सर्व सामान्यांच्या जेवणातून टोमॅटो आणि चहातून अद्रक हद्दपार झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
कोल्हापुरात अद्रक चहाचे दर वाढले
अद्रक महाग झाल्याने कोल्हापुरातील चहा विक्रेत्यांनी अद्रक चहाच्या दरामध्ये 4 ते 5 रुपयांनी वाढ केली आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांकडून अद्रकाच्या कडक चहाची मागणी जास्त प्रमाणात केली जाते. मात्र अद्रकाचे दर वाढल्याने साधारण चहाच्या किमतीमध्ये अद्रक टाकून चहा देणे परवडत नाही. त्यामुळे अद्रकाच्या चहाचे दर वाढवण्यात आल्याचे तेथील चहा विक्रेत्यांनी सांगितले. सध्या कोल्हापुर बाजार समितीमध्ये अद्रकाचे दर 155 रुपये किलो आहेत. मात्र किरकोळ खरेदी विक्री ही 220 रुपये किलोने सुरू आहे. सध्या कोल्हापूरमध्ये कटींग चहा 10 रुपयांना आणि अद्रक चहा 15 रुपयांने विकला जात आहे.