जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला. ज्या ज्येष्ठ नागरिकांना सरकारी पेन्शन मिळते त्या नागरिकांना दरवर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत पेन्शन जमा करणाऱ्या बँकेत जाऊन हयातीचा दाखला द्यावा लागतो.
पेन्शन घेणारी व्यक्ती जिवंत आहे याचा हा पुरावा असतो. हयातीचा दाखला बँकेत सादर केला नाही तर बँक पेन्शनधारक व्यक्ती मृत पावली आहे असे समजून पेन्शन जमा करणे बंद करू शकते. त्यामुळे हा दाखला वेळेत बँकेत सादर करणे अत्यावश्यक आहे. हा दाखला नेमका कुठे मिळतो? त्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात? याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात.
तुमच्या दारी मिळेल हयातीचा दाखला!
ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना हयातीचा दाखला मिळवणे जरा अवघड असते. कुठली कागदपत्रे द्यावी लागतात, ती कुठे जमा करावी लागतात याची माहिती अनेकांना नसते. वृद्धापकाळात तर वारंवार बँकेत जाणे देखील जमत नाही. परंतु आता मात्र टेन्शन घेण्याचं कारण नाही. कारण आता थेट तुमच्या घरापर्यंत येऊन पोस्टमन तुम्हांला हयातीचा दाखला देणार आहे.
पोस्टमन करणार मदत!
वित्त विभागाच्या निर्णयानुसार आता पोस्टमन हे वृध्द पेन्शनधारकांना हयातीचा दाखला काढून देण्यास मदत करणार आहेत. आधी पेन्शनधारकांना बँक किंवा पोस्टात जाऊन हा दाखला घ्यावा लागत होता. यासाठी वृध्द, अपंग पेन्शनधारकांना त्रास सहन करावा लागत होता.
या सगळ्या घटना लक्षात घेऊन आता पेन्शनधारकांना केवळ 70 रुपयांत त्यांचा हयातीचा दाखला घरबसल्या मिळणार आहे. पोस्टमन तुमच्या घरी येऊन तुमच्याकडून संबंधित कागदपत्रे जमा करेल आणि तुम्हांला तुमचा हयातीचा दाखला देखील आणून देईल.
कुठली कागदपत्रे आवश्यक?
जे पेन्शनधारक नागरिक पेन्शन घेत आहेत अशांना त्यांची काही कागदपत्रे पोस्टमनला द्यावी लागतील. यात पेन्शनधारकाचा पेन्शन नंबर, पेन्शन जमा होणाऱ्या बँकेचा खाते क्रमांक, आधार कार्ड आणि ज्या खात्याद्वारे तुम्हांला पेन्शन दिली जाते त्या खात्याची माहिती.
या आवश्यक कागदपात्रांची छायांकित प्रत तुम्हांला पोस्टमनकडे द्यायची आहे आणि सोबत 70 रुपये शुल्क देखील द्यायचे आहे. तुम्ही दिलेल्या 70 रुपयांची पावती पोस्टमन तुम्हांला देईल.
एकदा की तुम्ही तुमची कागदपत्रे आणि शुल्क जमा केले की त्यानंतर 15 दिवसांच्या आत तुम्हांला तुमचा हयातीचा दाखला घरपोहोच मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी तुमच्या गावातील पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधा किंवा परिसरात कामानिमित्त येणाऱ्या पोस्टमनकडून माहिती घ्या. हयातीचा दाखला वेळेत बँकेत सादर करण्यासाठी आधीच सर्व कागदपत्रे तयार ठेवा.