Free Bus Service for Schoolgirls: ग्रामीण भागातील शाळा घरापासून लांब असल्यामुळे तसेच तिथल्या पालकांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये. विशेषत: मुलींचे शिक्षण थांबू नये, यासाठी एसटी महामंडळाकडून इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्याकरिता मोफत पास दिला जातो.
एसटीतर्फे समाजातील विविध घटकांना प्रवास करताना सवलत दिली जाते. नुकतीच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व महिलांना एसटीने प्रवास करताना तिकिट दरात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे एसटी महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, अंध व अपंग व्यक्ती यांनाही एसटीने प्रवास करताना तिकिटाच्या दरात सवलत दिली जाते. याचप्रमाणे, महाराष्ट्र सरकारच्यावतीने एसटी महामंडळ पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी मोफत प्रवासाची सुविधा देते. या योजनेला अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना असे नाव देण्यात आले आहे.
Table of contents [Show]
अहिल्याबाई होळकर योजना कोणाला लागू आहे?
- अहिल्याबाई होळकर योजना ही फक्त ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना लागू आहे.
- स्थानिक पातळीवर माध्यमिक शिक्षणाची सोय असूनही दुसऱ्या गावात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना ही सवलत लागू राहणार नाही.
- सदर विद्यार्थीनीच शाळेतील उपस्थिती 75 टक्के असणे आवश्यक आहे. शाळेकडून त्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
अर्ज कोणाकडे आणि कसा सादर करावा
अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापकांना अर्जाद्वारे कळवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या अर्जावर शाळेच्या मुख्याध्यापिका पात्र विद्यार्थीनींची पुराव्यानिशी यादी तयार करून ती जवळच्या एसटी डेपो प्रमुखांकडे पाठवतील. एसटी डेपो प्रमुख सदर यादीची पडताळणी करून यादीतील विद्यार्थीनींना तीन महिन्यांचा मोफत पास उपलब्ध करून देतील.
ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी स्मार्ट कार्ड
शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळातर्फे स्मार्ट कार्ड योजना (Smart Card Scheme) राबवली जाते. स्मार्ट कार्ड योजना ही प्रवाशांचे वय निश्चित करून त्यांना त्यानुसार तिकिटदरामध्ये सवलत मिळवून देणारे कार्ड आहे. 65 वर्षांवरील नागरिकांकडे स्मार्ट कार्ड असेल त्यांना वयाचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र किंवा आधारकार्ड बाळगण्याची गरज नाही. तसेच हे स्मार्ट कार्ड चार्ज करून ज्येष्ठ नागरिक यातून तिकीटही काढू शकतात. यासाठी प्रवाशांना फक्त ते वेळोवेळी रिचार्ज करणे आवश्यक आहे.
स्मार्ट कार्ड कसे काढायचे?
स्मार्ट कार्ड काढण्यासाठी एसटी महामंडळाने डेपोनिहाय अधिकृत एजंटद्वारे नोंदणी केली जाते. तसेच बहुतांश राजकीय नेत्यांकडूनही स्मार्ट कार्ड काढण्याचे शिबिर भरवले जाते. यासाठी फोटो, वयाचा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड लागते. तसेच मोबाईल क्रमांक यासाठी महत्त्वाचा आहे.