अनेकांना उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याची खूप इच्छा असते. परंतु त्यासाठी येणारा शैक्षणिक खर्च लक्षात घेऊन अनेकजण हा निर्णय रद्द करतात. आपण कितीही नाही म्हटलं तरीही, उच्च शिक्षण घेताना पैसा हा महत्त्वाचा असतोच. पण आता तुमची परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. एका संशोधन अभ्यासानुसार काही युरोपीय देशांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेता येणार आहे. विशेष म्हणजे या देशातील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम मोफत स्वरूपातील असून माफक नोंदणी शुल्क आकारले जातात. कोणते आहेत हे देश? जाणून घेऊयात.
Erudera.com आणि Al- backed education search platform यांनी यासंदर्भात एक संशोधन केले आहे. त्यानुसार युरोपीय देशांमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या राहणीमानाच्या मासिक खर्चाची तुलना यामध्ये करण्यात आली आहे. यातील निदर्शनानुसार भारतीय विद्यार्थी खालील देशांमध्ये मोफत शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात.
फिनलंड
युरोपीय देशांपैकी एक देश म्हणजे 'फिनलंड'. या देशात फिन्निश किंवा स्वीडिश शिकलेल्या विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण हे विनामूल्य आहे. त्यामुळे जर तुम्हाला या भाषा अवगत असतील, तर तुम्ही याठिकाणी मोफत शिक्षण घेऊ शकता. भारतीय विद्यार्थ्यांसाठी तेथे निवासाचा मासिक खर्च €700 ते €1,300 च्या दरम्यान असू शकतो, जो भारतीय चलनानुसार 61,711 ते 1,14,606 रुपये इतका असेल.
फिनलंडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणारी विद्यापीठे पुढीलप्रमाणे-
- डायकोनिया युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस
- कजानी युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस
- ईस्टर्न फिनलंड युनिव्हर्सिटी
- टॅम्पेरे युनिव्हर्सिटी
- वासा युनिव्हर्सिटी
जर्मनी
अलीकडच्या काळात भारतीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर अमेरिकेनंतर जर्मनीला उच्च शिक्षणासाठी प्राधान्य देत आहेत. भारतासह युरोपियन किंवा गैर युरोपियन विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण याठिकाणी दिले जाते. भारतीय विद्यार्थ्यांसाठी याठिकाणी राहण्याचा मासिक खर्च जवळपास €934 असू शकतो, जो भारतीय चलनानुसार 82,340 रुपये इतका असेल. जागतिक विद्यापीठ क्रमवारीनुसार, 40 हून अधिक जर्मन विद्यापीठांनी जगातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणारी जर्मनीतील विद्यापीठे पुढीलप्रमाणे-
- टीयू म्युनिक
- एलएमयू म्युनिक
- बर्लिन युनिव्हर्सिटी
- टीयू बर्लिन
- म्युनस्टर युनिव्हर्सिटी
झेक रिपब्लिक
झेक रिपब्लिक या देशाला युरोपियन देशांचे हृदय म्हणून ओळखले जाते.या देशात देखील आंतराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे विद्यार्थ्यांचा राहण्याचा मासिक खर्च €300 ते €650 च्या दरम्यान असू शकतो, जो भारतीय चलनानुसार 26,447 ते 57,303 रुपये इतका असेल.
झेक रिपब्लिकमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणारी विद्यापीठे पुढीलप्रमाणे-
- झेक टेक्निकल युनिव्हर्सिटी
- अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स
- साऊथ बोहेमिया युनिव्हर्सिटी
- मासारिक युनिव्हर्सिटी
- मेंडेल युनिव्हर्सिटी
नॉर्वे
नॉर्वे हा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी निधी देणारा देश म्हणून ओळखला जातो. या ठिकाणच्या सार्वजनिक कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये शिकवणी विनामूल्य आहे, परंतु विद्यार्थ्यांना अल्प नोंदणी शुल्क भरावे लागते. याउलट खाजगी विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरावे लागते, जे संस्था आणि पदवीनुसार बदलू शकते. नॉर्वे हे राहण्यासाठी महागडे ठिकाण असूनही, त्यांच्या मोफत शिक्षण धोरणामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी हा देश सर्वात लोकप्रिय बनला आहे. देशातील सार्वजनिक विद्यापीठं सरकारी अनुदानित असल्याने, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण घेता येतं.
नॉर्वेमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणारी विद्यापीठे पुढीलप्रमाणे -
- ओस्लो युनिव्हर्सिटी
- बर्गन युनिव्हर्सिटी
- नॉर्ड युनिव्हर्सिटी
- स्टॅव्हॅन्गर युनिव्हर्सिटी
- एनएचएच स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
ब्राझील
मोफत शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या देशांच्या यादीत 'ब्राझील' या देशाचा देखील समावेश करण्यात आला आहे. जर तुम्हाला ब्राझील मधील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घ्यायचे असेल, तर तुम्ही विनामूल्य प्रवेश घेऊ शकता. यासाठी केवळ नोंदणी शुल्क तुम्हाला भरावे लागणार आहेत. हे शुल्क अगदी माफक स्वरूपात असतील. तुमच्या अभ्यासक्रमवार ते निर्धारित करण्यात येतील. महत्त्वाचं म्हणजे ब्राझीलमधील कोणत्याही विद्यापीठात अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पोर्तुगीज भाषेची परीक्षा द्यावी लागेल. ब्राझीलमधील अन्न आणि वाहतुकीचा खर्च जगातील इतर देशांच्या तुलनेत स्वस्त आहे, त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांसाठी हा परवडणारा देश आहे.
ब्राझीलमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणारी विद्यापीठे पुढीलप्रमाणे-
- साओ पाउलो युनिव्हर्सिटी
- सांता कॅटरिना फेडरल युनिव्हर्सिटी
- फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ ग्रांडे डो सुल
- फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ एबीसी
- रिओ दि जानेरोचे पोंटिफिकल कॅथोलिक युनिव्हर्सिटी