शेअर मार्केटमध्ये सध्या तेजीचे वातावरण आहे.आज सोमवारी 28 नोव्हेंबर 2022 रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीने रेकॉर्ड स्तर गाठला.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 62607 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 18584 अंकांचा All Time High चा टप्पा पार केला. या तेजीच्या घोडदौडीत परदेशी गुंतवणूकदारांची भक्कम गुंतवणूक कारणीभूत ठरली आहे.
अर्थव्यवस्थेची घोडदौड आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ या घटकांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांकी स्तर गाठला आहे.नोव्हेंबर महिन्यात परदेशी गुंतणूकदारांनी (Foreign Portfolio Investors) शेअर मार्केटमध्ये 31630 कोटींची गुंतवणूक केल्याचे दिसून आले आहे. त्यापूर्वी ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री करुन गुंतवणूक काढून घेतली होती. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार खरेदीदाराच्या भूमिकेत आहेत.
महागाई आणि मंदीच्या संकेतांनी जगभरातील प्रमुख केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढीचा सपाटा लावला आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर युरोप आणि अमेरिकेत महागाईने कहर केला आहे. तेथील सेंट्रल बँकांनी महागाई नियंत्रणासाठी मागील 20 वर्षांतील उच्चांकी व्याजदर वाढ केली आहे. त्याचप्रमाणे वाढते खर्च कमी करण्यासाठी बड्या कॉर्पोरेट कंपन्या हजारोंच्या संख्येने नोकर कपात करत आहे. यामुळे मंदीचे ढग गडद बनू लागले आहेत. याउलट आशियातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांची परिस्थिती तुलनेने चांगली आहे. परिणामी परदेशी गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा भारतासारख्या उदयोन्मुख बाजारांकडे वळवला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
शेअर मार्केटमधील आकडेवारीनुसार 1 ते 25 नोव्हेंबर 2022 मध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी 31630 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्याआधी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी 8 कोटींची गुंतवणूक काढून घेतली होती. सप्टेंबरमध्ये 7624 कोटींचे शेअर विक्री केले होते. ज्याची झळ शेअर निर्देशांकांना बसली होती.ऑगस्ट 2022 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी 51200 कोटी आणि जुलै 2022 मध्ये 5000 कोटींचे शेअर खरेदी केले होते.
शेअर मार्केटमध्ये चालू वर्षात 1.37 लाख कोटींची गुंतवणूक
रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत होण्याचा परिणाम परदेशी गुंतवणूकदारांच्या स्टॅटेजीवर होत असतो.ऑक्टोबर 2021 ते जून 2022 या सलग नऊ महिन्यांच्या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला होता. चालू वर्षाचा परदेशी गुंतवणुकीचा ओघ पाहता आतापर्यंत या गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये 1.37 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. फायनान्शिअल सर्व्हिसेस, आयटी, ऑटो आणि कॅपिटल गुड्स या क्षेत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची मोठी गुंतवणूक आहे.