National Panchayat Awards: ग्रामपंचायतींच्या सर्वसमावेशक विकासासाठी महाराष्ट्रातील पाच ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना व पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना प्रथम, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पाटोदा या ग्रामपंचायतीला द्वितीय तर कोल्हापूर जिल्ह्यातील अलाबाद ग्रामपंचायतीला तृतीय पुरस्कार मिळाला आहे. खंडोबाचीवाडी आणि टिकेकरवाडी दोन्ही ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एक कोटी रुपये सरकारकडून देण्यात आले आहेत.
केंद्रीय मंत्रालयाच्यावतीने या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. ग्रामीण विकास आणि पंचायती राज राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह सोमवार ते 21 एप्रिल दरम्यान साजरा केला जात आहे. याअंतर्गत येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आले. सांगली आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी येथील ग्रामपंचायतीने संयुक्त राष्ट्र संघाने निश्चित केलेल्या शाश्वत उद्दिष्टांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 403 लाभार्थ्यांची खाती उघडून गावातील लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला आहे.
या छोट्याशा गावात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी 28 बचत गटांची निर्मिती करण्यात आली. या माध्यमातून गावातील महिलांना 28 लाखांचे लोन उपलब्ध करून देण्यात आले. या लोनच्या रकमेतून महिलांनी कापड उद्योग, शिलाई मशीन, किराणा दुकान, मिरची कांडप, ब्युटी पार्लर, कुक्कुटपालन, पशुपालन व दुग्धव्यवसाय, शेळीपालन यासारखे छोटे व्यवसाय सुरू करून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 14 घरकुलांना मंजुरी मिळाली.
गावातील 349 शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ देण्यात आला आहे. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेंतर्गत (National Social Assistance Scheme) गावातील 22 दिव्यांग व महिलांना संजय गांधी निराधार निवृत्तीवेतन योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ दिला जात आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अन्नसुरक्षा योजनेचा 367 लाभार्थींना लाभ दिला जात आहे. या सर्व कामगिरीमुळे खंडोबाचीवाडी देशात अव्वल ठरली आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला कार्बन न्यूट्रल पंचायतीचा दुसरा पुरस्कार मिळाला. कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी या ग्रामपंचायतीने नवनवीन योजना राबविल्या आहेत. गाव प्रदूषण मुक्त होण्याकरिता या गावाने रस्त्यांच्या दोन्ही कडेला फळ भाज्यांची झाडे लावली आहेत. त्यामुळे हे गाव सुद्धा टॉप 5 मध्ये समाविष्ट झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील आलाबाद या ग्रामपंचायतीला महिला (The category of favorable panchayats) या तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. आलाबादची लोकसंख्या 1883 आहे, आणि त्यात महिलांची संख्या 848 म्हणजेच 50% महिला आहेत. ग्रामपंचायत आलाबादने महिला सक्षमीकरण आणि बाल विकासावर काम केले. शाळाबाह्य मुली, कमी वजनाच्या मुली आणि अशक्त मुली आणि महिला यावर ग्रामपंचायतने विशेष भर दिला. महिला सभेच्यावेळी ग्रामपंचायत महिलांना एकत्र करण्यासाठी छोट्या कार्यक्रमांचे आयोजन करीत असते.