Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax on Small Savings : छोट्या बचतींवरही असणार लक्ष, काय आहे आयकर विभागाची मोहीम?

Income Tax on Small Savings : छोट्या बचतींवरही असणार लक्ष, काय आहे आयकर विभागाची मोहीम?

IncomeTax on Small Savings : करचोरी पकडण्यासाठी आयकर विभाग आता सतर्क झालाय. छोट्या बचतींवरही आयकर विभागाचं लक्ष असणार आहे. आयकर विभाग सर्व आयटीआर परतावा आणि गुंतवणुकीवर काटेकोरपणे लक्ष ठेवत आहे.

करचोरी (tax evasion) पकडण्याच्या उद्देशानं आयकर विभागानं (Income Tax department) अलिकडेच बेनामी ठेवी पकडल्या आहेत. आता विभाग पहिल्यापेक्षा अधिक सतर्क झालाय. या सर्व अशा ठेवी आहेत, ज्यांचा आयटीआर रिटर्नमध्ये कुठेही उल्लेख नाही. लहान बचत योजनांवरच्या (Small savings schemes) जवळपास 50 लाखांहूनही अधिक गुंतवणुकीची (Investment) तपासणी विभागानं केलीय. किसान विकास पत्र आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या माध्यमातून या ठेवी असल्याचं आयकर विभागानं म्हटलंय. ईटीनं यासंदर्भातलं वृत्त दिलंय.

कमी कालावधीसाठी गुंतवणूक

आयकराच्या तावडीत लहान बचत योजना किसान विकास पत्र आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या अनेक लोकांच्या बेनामी ठेवी आहेत. यासाठी आयकर विभागाकडून आयटीआर रिटर्नशिवाय 1 कोटींहून अधिक रक्कम जमा करणाऱ्यांना नोटीस पाठवली जात आहे. माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, ही गुंतवणूक कमी कालावधीसाठी तसंच मुलांच्या नावावर करण्यात आल्याचं तपासात दिसून आलंय. प्राप्तिकर विभागानं आतापर्यंत 150 जणांना नोटीस पाठवली आहे.

पोस्ट ऑफिसना सूचना

ईटीच्या रिपोर्टनुसार, पोस्ट ऑफिसने आपल्या खातेधारकांची केवायसी (नो युवर कस्टमर) पुन्हा एकदा पडताळणी करावी, असं प्राप्तिकर विभागानं सांगितलंय. यामध्ये अल्पबचत योजनेचे ते गुंतवणूकदार आहेत, ज्यांनी 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूक केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, गुंतवणूकदारांना कमी जोखीम, जास्त जोखीम आणि गंभीर जोखीम या प्रकारामध्ये टाकून त्यांची चौकशी केली जाईल, असं सांगण्यात आलंय.

काटेकोर अंमलबजावणी

एनआरआय तसंच एचएनआय म्हणजेच अनिवासी भारतीय आणि उच्च निव्वळ मूल्य असलेल्या व्यक्ती म्हणजेच ज्यांचं उत्पन्न खूप जास्त आहे, असे लोक या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकणार नाहीत. नुकतंच टपाल विभागानं एक मास्टर परिपत्रक जारी केलं होतं. या परिपत्रकानुसार, टपाल विभागानं केवायसी नियमांचं योग्य प्रकारे पालन न करणारी सर्व खाती गोठवण्यास पोस्ट कार्यालयांना सांगितलं होतं. त्यामुळे आता केवायसी नियमांचं अधिक काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे. एनआरआय तसंच एचएनआय यांच्यासाठीचे नियमही व्यवस्थितपणे पाळले जात आहेत की नाही, ते ही तपासलं जाणार आहे.

'अशी'ही होते करचोरी

लहान बचत योजनांच्या माध्यमातून तर करचोरी होतेय. मात्र कर चुकवणारे विविध मार्गांचा अवलंब करत असतात. काही दिवसांपूर्वी विविध मोबाइल अ‍ॅप्स विशेषत: ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप्स कर चुकवेगिरी करत असल्याचं समोर आलं होतं. ऑनलाइन सट्टेबाजी, जुगार अशा कामांमध्ये संबंधितांचा सहभाग आढळला होता. विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष तपासणी केली असता ही बाब उघड झाली होती. त्यामुळे कोणत्याही माध्यमातून कर चुकवणाऱ्यांवर आयकर विभाग आता लक्ष ठेवणार आहे.