अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी क्रिप्टोकरन्सीसंदर्भात (Cryptocurrency) जागतिक फ्रेमवर्कचे समर्थन केले. यासोबतच त्यांनी कर्जाची जागतिक कमजोरी दूर करणे आणि बहुपक्षीय विकास बँकांना बळकटी देण्याबाबतही सांगितले.
Table of contents [Show]
अर्थमंत्री अनेक बैठका घेणार आहेत
जी-20 देशांच्या अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांच्या पहिल्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अर्थमंत्री सीतारामन बेंगळुरूमध्ये आहेत. शुक्रवारपासून ही दोन दिवसीय बैठक सुरू होत आहे. तत्पूर्वी, अर्थमंत्र्यांनी जी-20 सदस्य देश ब्रिटन, जपान, इटली आणि स्पेनमधील त्यांच्या समकक्षांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी क्रिप्टोकरन्सीसह इतर मुद्दे उपस्थित केले. सीतारामन अशा 10 बैठका घेणार आहेत. जी-20 हा विकसित आणि विकसनशील देशांचा समूह आहे. सध्या जी-20 देशांचे अर्थमंत्री आणि सर्व देशांच्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नर बैठकीच्या संदर्भात बेंगळुरूमध्ये आहेत. या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दासही भारताकडून सहभागी होत आहेत.
या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते
गेल्या महिन्यात ग्लोबल साऊथ समिटच्या मंत्रिस्तरीय सत्राला संबोधित करताना, अर्थमंत्र्यांनी सांगितले होते की भारत जी-20 बैठकीत ग्लोबल साउथच्या विकासाचे मुद्दे उपस्थित करेल. भारताने असेही म्हटले होते की फर्स्ट वर्ल्ड आणि थर्ड वर्ल्ड नाही तर फक्त एकाच जगाची गरज आहे, कारण प्रत्येकाचे भविष्य सामायिक आहे. भारत विविध मंचांद्वारे बहुपक्षीय निधी संस्थांमध्ये सुधारणांची मागणी करत आहे, विशेषत: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक. जी-20 च्या या बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
कर्जाचे संकट खूप गंभीर
जागतिक कर्ज संकटावर गांभीर्याने उपाययोजना न केल्यास त्याचे परिणाम वाईट होण्याची शक्यता आहे. साथीच्या रोगामुळे आणि सध्याच्या भू-राजकीय संकटामुळे विकसनशील देशांना भेडसावणाऱ्या गंभीर कर्जाच्या संकटावर उपाय शोधण्यासाठी भारत दीर्घकाळापासून प्रयत्न करत आहे. विकसनशील देशांच्या या समस्येवर काम केले नाही तर त्यामुळे जागतिक आर्थिक मंदी येऊ शकते आणि लाखो लोक अत्यंत गरिबीच्या खाईत जाऊ शकतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट येलेन यांच्यासोबतही बैठक घेतली. या बैठकीत क्रिप्टो मालमत्ता, बहुपक्षीय विकास बँकांना बळकट करण्याचे मार्ग आणि जागतिक कर्ज संकटाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली.
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?
क्रिप्टोकरन्सी हे एक आभासी चलन (Virtual currency) आहे. ते स्वतंत्र चलन आहे. म्हणजेच त्याचा कोणीही मालक नाही. संगणकाचा वापर करून हे चलन बनवण्यात आले आहे. ह्याचा वापर करून आपण जगातील कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवू शकतो. क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल चलन असून, यासाठी क्रिप्टोग्राफी वापरली जाते. वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करता येऊ शकतो. याच्या वापरासाठी कोणत्याही बॅंकेत किंवा सरकारी संस्थेत जावे लागत नाही. याचा वापर इंटरनेटच्या मदतीने करावा लागतो.