Luxury Plane Travel: सेवा क्षेत्राला कोरोनानंतर पुन्हा अच्छे दिन आले आहेत. ग्राहकांची मागणी वाढू लागल्यानं सेवा क्षेत्रातील कंपन्याही नवनवीन कल्पना घेऊन येत आहेत. भारतीय वंशाच्या कबीर मूलचंदानी यांनी आलिशान हवाई प्रवासाची भन्नाट आयडीया सत्यात उतरवली आहे. प्राइव्हेट जेटच्या एक तास प्रवासासाठी ते तब्बल 11 लाख रुपये आकारत आहेत. मात्र, त्या तोडीच्या सुविधाही प्रवाशांना देण्यात येत आहेत.
अद्याप अशा प्रकारची लक्झ्युरियस सुविधा कोणीही सुरू केली नाही. कॉर्पोरेट आणि बिझनेस जेटमध्ये ज्या सुविधा दिल्या जातात त्यापेक्षा अधिक सुविधा या लक्झरी प्लेनमध्ये देण्यात आल्या आहेत. कॉर्पोरेट जेटमध्ये मिटिंग रुम, कॉन्फरन्स रूम, बार अशा सुविधा असतात. मात्र, या जेटमध्ये किंग साइज बेड, डायनिंग टेबल, स्पा, 55 इंची एलइडी टीव्ही, पार्टी मोड लाइटिंग, शॉवर रूम अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.
पार्टी मोड ऑन
हे विमान खास प्रवाशांना लक्झ्युरीयस सेवा देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. विमानाच्या केबिनमध्ये आकर्षक एलइडी लाइटिंग केली आहे. विमानात मूडनुसार अॅम्बियंस सेट करता येईल. या जेटमध्ये किंग साइज बेड देण्यात आला आहे. सोबतच सेफ्टीसाठी ‘गस्ट बेल्ट’ही देण्यात आला आहे.
कधीही विसरता येणार नाही असा प्रवासाचा अनुभव देण्याचा प्रयत्न Five Hotels & Resorts या कंपनीने केला आहे. या जेटमध्ये 8 लोक एकाच वेळी जेवण करतील एवढा मोठा डायनिंग टेबल आहे.
भारतीय वंशाचे कबीर मूलचंदानी हे Five Hotels & Resorts चे मालक आहेत. 2017 साली त्यांनी कंपनी सुरू केली. या कंपनीची अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट जगभरात आहेत. आता कंपनीने आलिशान प्राइव्हेट जेटची सेवा सुरू केली आहे. यासाठी वापरण्यात आलेले विमान कबीर मुलचंदानी यांच्या मालकीचे आहे.
जगभरातील सेवा क्षेत्रातील कंपन्या विमानाचा वापर करतात. मात्र, अशा पद्धतीची सेवा कोणत्याही कंपनीने देऊ केली नाही. आफ्रिकन सफारी करताना विमानाचा वापर प्रामुख्याने पर्यटकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्यासाठी केला जातो. मालदीव, सिंगापूर या देशातही जेटचा वापर प्रामुख्याने पर्यटकांना एका बेटावरुन दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी केला जातो. काही मोठ्या हॉटेल कंपन्यांकडे जेट आहेत मात्र, ते कंत्राटी पद्धतीने घेतलेले असतात.
या खास विमान सेवेचे नाव Fly FIVE असे ठेवण्यात आले आहे. लंडन ते दुबई प्रवास करण्यासाठी 13,000 डॉलर म्हणजेच 11-12 लाख रुपये प्रति तास आकारले जातात.