Road safety week 2023: दरवर्षीं भारतात 11 ते 17 जानेवारी हा कालावधी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह(Road safety week) म्हणून साजरा केला जातो. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने(Ministry of Road Transport & Highways, Government of India) आयोजित केलेल्या या सप्ताहाचा उद्देश रस्त्यावरील वाहतूक सुरक्षे विषयी जागरूकता पसरवणे आहे, जो सध्या एक चिंतेचा विषय आहे. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहा दरम्यान, बेपर्वाईने किंवा निष्काळजीपणे वाहन चालविण्यामुळे होणाऱ्या परिणामांबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी विविध संस्था आणि गट एकत्र येतात. समुदाय केंद्रे आणि कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरणे केली जातात व कार्यशाळा(Workshop) आयोजित करून लोकांना सुरक्षित ड्रायव्हिंग सवयींबद्दल माहिती दिली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? रहदारीचे नियम मोडणे केवळ बेकायदेशीरच नाही तर रस्ता वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी धोकादायक देखील आहे. त्यामुळे, गुन्ह्याच्या स्वरूपानुसार शिक्षेची तीव्रता बदलत असताना, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिकाऱ्यांनी दंड आकारल्यावर आश्चर्य वाटायला नको. वाहतूक कायदा मोडल्यावर परिणाम स्वरूपी काहीशे रुपयांच्या दंडापासून ते ड्रायव्हिंग लायसन्सच्या(DL) अपात्रतेपर्यंत आणि काही प्रकरणांमध्ये कारावासाची शिक्षा देखील मिळू शकते. चला तर ‘Road safety week 2023’ च्या निमित्ताने वाहतुकीचे कोणते नियम मोडले की किती दंड होतो हे जाणून घेऊयात.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दंडामध्ये दर काही वर्षांनी सुधारणा केली जाते आणि त्याच अनुषंगाने शिक्षेमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. भारतातील नवीन रहदारी नियम आणि दंड याबद्दलची माहिती तुम्हाला असायलाच पाहिजे. भारतातील सर्व वाहतूक नियम हे नवीन मोटार वाहन(सुधारणा) कायदा, 2019 नुसार परिभाषित केले आहेत.
वाहतूक नियम व त्यासाठी आकारला जाणारा दंड पुढीलप्रमाणे
- वाहतूक अधिकाऱ्यांचे आदेश न मानणे किंवा मागणी केलेली माहिती न पुरवल्यास किंवा नकार दिल्यास 2,000 रुपये दंड आकारला जातो. हाच दंड पूर्वी 500रुपये होता
- विनापरवाना अनधिकृत वाहन चालवत असाल तर 5,000 रुपये दंड होऊ शकतो. तर विना परवाना वाहन चालवले तर 5,000 रुपये दंड होतो. यासाठी 500 रुपये पूर्वी दंड द्यावा लागायचे. तुम्ही अपात्र परवान्यासह वाहन चालवत असाल तर 10,000 रुपये दंड होईल. यासाठी पूर्वी 500 रुपये दंड आकारला जायचा
- याशिवाय हलके मोटार वाहनाने तुम्ही ओव्हरस्पीडींग केले तर 1,000 ते 2,000 रुपये दंड होऊ शकतो. तेच जर तुम्ही माध्यम प्रवासी किंवा मालवाहू वाहनाने ओव्हरस्पीडींग केले तर 2,000 रुपयांपासून 4,000 रुपयांपर्यंत आणि त्यानंतरच्या किंवा दुसऱ्यांदा गुन्ह्यासाठी गाडी चालवण्याचा परवाना(DL) जप्त केला जाऊ शकतो
- तुम्ही जे रॅश ड्रायव्हिंग करत असाल तर पहिल्याच वेळेला गुन्हा दाखल झाला तर 6 महिने ते 1 वर्षाचा तुरुंगवास किंवा 1,000 ते 5,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. जर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल झाला तर 2 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो
- दारू किंवा मादक पदार्थांचे सेवन करून तुम्ही वाहन चालवत असाल तर पहिल्यांदा जर तुम्हाला पकडले तर 10,000 रुपयाचा दंड किंवा 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. जर तुम्हाला दुसऱ्यांदा पकडले तर 15,000 रुपयांपर्यंत दंड किंवा 2 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो
- परवान्याशिवाय मोठ्या आकाराची वाहने चालवली आणि पकडला गेलात तर 5,000 रुपये दंड होईल
- तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अयोग्य असताना वाहन चालवले व पहिल्यांदाच पकडले गेलात तर 1,000 रुपये दंड व दुसऱ्यांदा पकडले गेलात तर 2,000 रुपये दंड आकारण्यात येतो
- विमा नसलेले वाहन चालवले(वैध विमाशिवाय) तर पहिल्यांदाच गुन्हा झाला तर 2,000 रुपये दंड किंवा 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. जर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल झाला तर मात्र 4,000 रुपये दंड किंवा 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.पूर्वी या गुन्ह्यासाठी 1,000 रुपये दंड आकारला जात होता
- ओव्हर लोडींगसाठी 20,000 रुपयांचा दंड आकारण्यात येतो, हा दंड 2,000 रुपये प्रति टन अशा स्वरूपात असतो. प्रवाश्यांचे ओव्हरलोडींग करण्यात आले असेल तर प्रति प्रवासी 1,000 रुपये दंड आकारला जातो
- आता सीटबेल्ट न लावता गाडी चालवली तर 1,000 रुपये दंड आकारला जातो
- हेल्मेट न घालता वाहन चालवले तर 1,000 रुपयांचा दंड किंवा 3 महिन्यासाठी परवाना रद्द करण्यात येतो
- आपत्कालीन वाहनासाठी मार्ग उपलब्ध करून न दिल्यास देखील 10,000 रुपयांचा दंड किंवा 6 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो
- रस्ता नियमांपैकी कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास नवीन दंडानुसार(सप्टेंबर 2019) 500 ते 1000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागतो
- विना तिकीट प्रवास केल्यास 500 रुपये दंड आकारला जातो. पूर्वी हा दंड 200 रुपयांपर्यंत मर्यादित होता, मात्र आता तो वाढवला आहे
- याशिवाय अल्पवयीन मुलांनी एखादा गुन्हा केला तर 25,000 रुपये दंडासह 3 वर्षाच्या कारावास हा पालक किंवा मालकाला भोगावा लागेल.