ग्राहकांना उत्पादन आणि सेवा विकण्यासाठी कंपन्यांमध्ये चढाओढ लागलेली असते. जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स दिल्या जातात. या जाहिरातींना आणि कंपनीच्या आश्वासनांना ग्राहकही भुलतात. मात्र, वरवर दिसणारे फायदे खरंच असतात का? तर नक्कीच नाही. त्यामध्ये अनेक इतर शुल्क, नियम अटी असतात. ज्या कंपन्या ग्राहकांना कधीच सांगत नाहीत. आरोग्य किंवा जीवन विमा घेतानाही प्रत्येकाने विमा पॉलिसीची कागदपत्रे बाराकाईने वाचून घेतली पाहिजे, तरच त्यावर सह्या करायला हव्यात. या पॉलिसींमध्ये नियम आणि अटी इतक्या असतात की तुम्ही जर त्या वाचल्या नाही तर पुढे जाऊन तुमचे नुकसान होऊ शकते. जसे की, तुमचा विम्याचा दावा या अटी-नियमांवर बोट ठेवून नाकारला जाईल. त्यामुळे जागरुक ग्राहक म्हणून ही तुमची जबाबदारी आहे की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित वाचूनच निर्णय घ्यायचा.
विमा पॉलिसीच्या कागदपत्रामध्ये काय तपासून घ्यावे?
विम्यात समाविष्ट नसलेल्या बाबी कोणत्या?
आरोग्य विमा किंवा जीवन विमा यामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्यासाठी तुम्हाला संरक्षण मिळत नाही. जसे की, पूर्वीपासून असलेले आजार, तुम्ही जोखमीचे काम करत असाल तर त्यामधून उद्भवणारे अपघात, साहसी खेळातून उद्भवणारे अपघात अशा गोष्टी विम्यामध्ये कव्हर नसतात. म्हणजे तुम्ही दवाखान्यामध्ये भरती झाल्यानंतर दावा केल्यास कंपनी तुमचा दावा नाकारू शकते. आत्महत्या, साहसी खेळातून झालेला मृत्यू, जोखमीचे काम करताना झालेला मृत्यू, कायदा मोडून केलेल्या गोष्टींतून जर एखाद्याचा मृत्यू झाल्यास या गोष्टींना विम्यातून संरक्षण मिळत नाही. त्यामुळे विमा खरेदी करताना कोणते आजार किंवा जोखमींपासून विम्यात संरक्षण नाही याची बारकाईने माहिती घ्या.
प्रतिक्षा कालावधी -
बऱ्याच जणांना असे वाटते की, विमा पॉलिसी खरेदी केली की आपण लगेच दुसऱ्या दिवसापासून संरक्षण मिळते. मात्र, विमा कंपन्यांकडून काही महिन्यांपर्यंत प्रतिक्षा कालावधी ठेवण्यात येतो. गंभीर आजारांच्या बाबतीत हे बाराकाईने तपासून पाहिले जाते. जर तुम्ही टर्म इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केली असेल आणि क्रिटिकल इलनेचा रायडर खरेदी केला असेल तर त्यासाठी वेटिंग पिरियट असण्याची शक्यता जास्त असते. हा कालावधी पाच वर्षांपर्यंतही असून शकतो. म्हणजे जर तुम्ही टर्म पॉलिसी खरेदी केली आणि सहा महिन्यांतच तुम्हाला कॅन्सरचे निदान झाले तर विमा कंपनी तुम्हाला गंभीर आजाराबाबत असलेली दाव्याची रक्कम देणार नाही. विविध आजारांसाठी किती प्रतिक्षा कालावधी आहे हे तुम्ही तपासून घ्यायला हवे.
सबलिमिट -
जर तुम्ही दहा लाखांची आरोग्य विमा पॉलिसी घेतली असेल तर तुम्हाला असे वाटू शकते की हे दहा लाखांचे सरंक्षण प्रत्येक आजारापासून आहे. मात्र, काही आजारांसाठी कंपनी रकमेची मर्यादा घालते. जसे की, किडनीसंबंधीत काही व्याधी निर्माण झाली तर त्यासाठी फक्त 4 लाख रुपयांची मर्यादा असू शकते. म्हणजे यापेक्षा जास्त रुग्णालयाचे बील झाले तर विमा कंपनी पैसे देणार नाही. विविध आजारांसाठी किती लिमिट आहे हे तुम्ही बारकाईने तपासून घेतले पाहिजे.
इतर बेनिफिट-
रुम रेंट, पॉलिसी मॅच्युरिटी पिरियड, पॉलिसीवरील कर, तुम्ही विमा कंपनीला दिलेली माहिती आणि पॉलिसी बाँडमधील माहिती सारखीच आहे का? यासारख्या गोष्टी तुम्ही तपासून पाहिल्या पाहिजेत. कोणते आजार समाविष्ट नाहीत, दावा करण्यासाठी दिलेला कालावधी याबाबतचीही माहिती आधीच माहित असणे गरजेचे आहे.