• 02 Oct, 2022 09:33

भारतातील सीईओ वर्षाला किती पगार घेतात, जाणून घ्या!

ceo

इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख (Infosys CEO Salil Parekh) यांच्या वार्षिक वेतनात 43 टक्क्यांनी वाढ झाली असून त्यांचे वेतन 71 कोटींवर पोहोचले आहे. पारेख यांच्याप्रमाणेच भारतातील इतर कंपन्यांच्या सीईओना किती पगार असतो, हे आपण पाहणार आहोत.

इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) सलील पारेख (Infosys CEO & MD, Salil Parekh) यांच्या वार्षिक वेतनात 43 टक्क्यांनी वाढ झाली असून त्यांचे 2021-22 या आर्थिक वर्षातील वेतन 71 कोटींवर पोहोचले आहे. या भरघोस वेतनवाढीमुळे सलील पारेख हे भारतातील सर्वाधिक पगार घेणार्‍या अधिकार्‍यांपैकी एक ठरले आहेत.

सलील पारेख यांनी कंपनीच्या उद्योगात वाढ करण्यासाठी तसेच त्याला एका उंचीवर नेण्यासाठी महत्त्वाची कामगिरी केली. त्याच्यामुळे कंपनीने त्यांना ही वेतनवाढ दिली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. पारेख यांना जागतिक आयटी सेवा क्षेत्रातला 30 वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव आहे. इन्फोसिसने पारेख यांना वेतनवाढीबरोबरच मुख्य कार्यकारी अधिकार पदाचा कालावधी ही 5 वर्षांसाठी वाढवला आहे. त्यांचा इन्फोसिसमधील कार्यकाल आता मार्च 2027 मध्ये संपेल.

भारतातील आणखी काही सर्वाधिक पगार घेणारे सीईओ कोण आहेत, ते पाहुया.

मुकेश अंबानी (रिलायन्स इंडस्ट्रीज)

मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आहेत आणि त्यांच्याकडे कंपनीत सुमारे 44 टक्के हिस्सा आहे. बिझनेस स्टँडर्ड या इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार त्यांनी 2020 मध्ये त्याच्या फ्लॅगशिप फर्ममधून स्वत:चा वार्षिक पगार 15 कोटी एवढा ठेवला आहे.

सीपी गुरनानी (टेक महिंद्रा)

सीपी गुरनानी हे टेक महिंद्राचे सीईओ आणि एमडी आहेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, 2020 या आर्थिक वर्षात गुरनानी यांनी 28.57 कोटी रुपयांची कमाई केली होती.

एसएन सुब्रह्मण्यन (लार्सन अँड टुब्रो)

लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक एस एन सुब्रह्मण्यन यांनी 2019-20 मध्ये कोविड-19 महामारीच्या काळात वेतनातून ऐच्छिक 43.91 टक्के कपात करून 27.17 कोटी रुपये घेतले होते, असे इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले.

राजेश गोपीनाथन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस)

एन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये राजेश गोपीनाथन यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, 2013 पासून गोपीनाथन यांनी कंपनीचे सीएफओ म्हणून काम केले होते. लाईव्हमिंटच्या वृत्तानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात गोपीनाथन यांच्या वेतनात 26 टक्क्यांनी वाढ करून त्यांचे वेतन 25.7 कोटी झाले.

पवन मुंजाल (हिरो मोटोकॉर्प)

पवन मुंजाल हे हिरो मोटोकॉर्पचे (Hero Motocorp) अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आहेत. त्यांनी 2020 या वर्षात वेतन म्हणून 84.59 कोटी रूपये घेतले होते, असे लाईव्हमिंटने म्हटले.

राजीव बजाज (बजाज ऑटो)

राजीव बजाज हे 2005 पासून कंपनीचे एमडी आहेत. 2020 मध्ये बजाज ऑटोचे सीईओ आणि एमडी म्हणून राजीव बजाज यांना 39.86 कोटी रूपये वेतन मिळाले होते, असे लाईव्हमिंटने म्हटले.

सुनील मित्तल (भारती एंटरप्रायझेस)

सुनील मित्तल हे भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्यांना 2020 मध्ये 30.1 कोटी रूपयांचे वेतन मिळाले होते.

सिद्धार्थ लाल (आयशर मोटर्स लिमिटेड)

आयशर मोटर्सचे सिद्धार्थ लाल यांना 2020 मध्ये 50 टक्के पगारवाढ देण्यात आली होती. 2019 मध्ये त्यांचे वेतन 12.81 कोटी होते ते वाढून 2020 मध्ये 19.21 कोटी झाले होते, असे मनीकंट्रोल या संकेतस्थळाने म्हटले.

संजीव पुरी (आयटीसी लिमिटेड)

संजीव पुरी हे मे, 2019 पासून आयटीसी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. यापूर्वी त्यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, सीईओ आणि सीओओ म्हणून काम पाहिले आहे. 2020-21 मध्ये त्याचे वार्षिक वेतन 47.23 टक्क्यांनी वाढून 10.10 कोटी झाले असल्याचे बिझनेस टुडेने वृत्त दिले.

एन. चंद्रशेखरन (टाटा सन्स)

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, टाटा सन्सच्या अध्यक्षांना 2020 या वर्षासाठी 58 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. तर 2019 या वर्षामध्ये एन. चंद्रशेखरन यांचा पगार 66 कोटी रूपये होता.