Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जाणून घ्या हॉटेलमधील ‘टीप’बद्दल सर्व काही!

billing

हॉटेलमध्ये खाणं-पिणं झाल्यावर टीप (tip) किती द्यावी किंवा द्यावी का नाही, हा मुद्दा जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. भारतातील काही हॉटेल व्यावसायिक सर्व्हिस चार्ज (service charge) सरसकट बिलात लावत असल्याचे लक्षात आल्यावर सरकारने त्यावर आक्षेप घेतला आहे.

काही हॉटेलांनी बिलासोबत सर्व्हिस चार्ज (service charge) आकारायला सुरुवात केल्यामुळे सरकारने यात लक्ष घातले. ग्राहक मंत्रालयाने सर्व्हिस चार्ज आकारणे कायद्याला धरून नाही, असं अगदी अलीकडेच सुरुवातीला स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचनाही जारी करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व्हिस चार्ज या शब्दाला ग्राहक सर्व्हिस टॅक्स समजून तो सहजपणे भरून टाकतात. सर्व्हिस चार्ज हा विषय पूर्णपणे ऐच्छिक आहे. त्यामुळे त्याची आकारणी बिलात करणं कायदेशीर नाही, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आल्याचं वृत्त आहे.

हॉटेलमध्ये (hotel) मिळालेल्या सर्व्हिसबद्दल काही ना काही रक्कम देण्याची पद्धत जगात कमीअधिक आहेच. कधी तिला टीपच म्हटले जाते. कधी तिला सर्व्हिस चार्ज म्हटलं जातं किंवा कधी आणखी काही. आधुनिक खान-पान गृह अर्थात हॉटेल आणि रेस्तरां इतकाच तो जुना आहे.  ब्रिटीश आणि युरोपीयांच्या वसाहती जगभरात पसरत गेल्या तशा युरोपीयन संस्कृतीतल्या काही गोष्टींचाही प्रसार झाला. टेबल सर्व्हिस देणारी रेस्तरां किंवा हॉटेल ही त्यातीलच एक गोष्ट. टेबलवर पाण्यापासून सगळ्या गोष्टी आणून देणाऱ्या शेवटी बिलही आपली रक्कम नेऊन पे (pay) करून देणाऱ्या या माणसाच्या सेवेवर खुश होऊन त्याला किंवा टीप किंवा बक्षिसी देण्याची पद्धत युरोपात शतकांइतकी जुनी आहे. 

असं असलं तरी टीपबाबत जगात वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या चाली पाहायला मिळतात. काही ठिकाणी टीप हा पूर्ण खुशीचा मामला असतो आणि ग्राहक (customer) तसेच संबंधित वेटर किंवा वेट्रेस यांच्यातली खासगी गोष्ट असते. हॉटेल व्यवस्थापनाशी त्याचा काही संबंध नसतो. काही ठिकाणी मेन्यूकार्डवरच टीप लिहिली जाते आणि ती द्यावी अशी अपेक्षा असते. काही देशांत तर चक्क टीपदेखील बिलातच नोंदवून येते आणि इतर वस्तुंच्या किमतीसोबत तीही चुकती करावी लागते. फारच अशी हॉटेल्स आहेत की जिथे टीप स्वीकारली जात नाही. काही ठिकाणी तर टीप देऊ नका, असं चक्क बजावलं जातं. जसे देश, जशा स्थानिक चालीरिती, असे याबाबत म्हणता येईल.

टीप द्यावी का आणि दिल्यास त्याचं स्टेटस काय असावं याबाबत जशी मतभिन्नता दिसते तशीच टीप किती द्यावी हा मुद्दाही चर्चेत असतो. या सगळयात इतकं वैविध्य आहे की याची चर्चा करणारे लेख आणि पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. शिवाय जगभरात पिढी - दर पिढी त्याचे स्वरुप बदलत असतं ही गोष्टही आहे. काही ठिकाणी टीपची बिलाशी कोणतीही सांगड न घालता स्वतःला हवी तेवढी टीप दिली-घेतली जाते. काही ठिकाणी बिलाच्या रकमेच्या विशिष्ट टक्केवारीतच टीप द्यावी इथपर्यंत यातही व्हेरिएशन्स आहेत. बिलाच्या दोन - पाच टक्क्यांपासून अगदी वीस - पंचवीस टक्क्यांपर्यंत घसघशीत टीप दिली – घेतली गेली आहे.

टीप देण्याबाबतच्या निर्णयामागेही काय क्रायटेरिया असावा यात मतभिन्नता असते. बिलातच लावून येणारी टीप किंवा सर्व्हिस चार्ज असेल तर ठरवण्याचा मुद्दा निकाली निघतो. मात्र ती तशी नसेल तर सहसा ग्राहक त्याच्या मतानुसार टीप देतो. यात प्रामुख्याने ग्राहकाची हॉटेलमधून जातानाची मनःस्थिती काम करते. आपल्याला अतिशय उत्तम सेवा मिळाली, अशी ग्राहकाची भावना असेल तर त्याला टीपही उत्तम मिळते. काही ठिकाणी खरोखर चांगली टीप देण्याचीच भावना व्हावी इतकी उत्तम सेवा मिळतही असते.

मात्र आता सरकारनेच भारतात सर्व्हिस चार्ज किंवा टीप देण्याचा विषय हा स्वयंस्फुर्तीने करण्याचा असल्याचे सांगितल्यानंतर संशयाला जागा उरणार नाही. अर्थात त्यांसदर्भात अधिक स्पष्टीकरण लवकरच होईल. ऑर्डर केलेल्या एखाद्या चमचमीत डिशइतकीच पुढील सूचनांची, हॉटेलिंग करणाऱ्यांना निश्चितच प्रतीक्षा असेल.