मित्रांनो सध्या नोकरीचा विषय चांगलाच चर्चेत आहे. भारतात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढते आहे आणि पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध नाहीत अशी एक चर्चा आहे. यासोबतच कंत्राटी कामगार भरती मोठ्या प्रमाणात होत असून कायमस्वरूपी नोकऱ्या फारच कमी आहेत.
सरकारी जॉब्समध्ये देखील नोकऱ्यांचे कंत्राटीकरण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे. कायमस्वरूपी कामगारांना ज्या सवलती मिळतात त्या कंत्राटी कामगारांना मिळत नाहीत. नोकरी कधी जाईल याचा काही नेम नसतो. त्यामुळे कायमस्वरूपी नोकरीच्या जाहिराती आल्या की लाखो तरुण-तरुणी त्यासाठी अर्ज करताना दिसतात. नुकत्याच तलाठी भारती प्रक्रियेत हे चित्र पाहायला मिळाले होते.
या लेखात कंत्राटी कामगार आणि कायमस्वरूपी कामगार यांच्याविषयी जाणून घेऊयात. तसेच त्यांच्या कामाच्या स्वरूपाची देखील चर्चा करूयात.
कंत्राटी रोजगार
नावाप्रमाणे या प्रकारचा रोजगार हा अस्थायी असतो. कंपनीला कंत्राटी कामगार नेमण्यासाठी आणि त्याला पगार देण्यासाठी फारसा त्रास सहन करावा लागत नाही. कंत्राटी कामगाराला कंपनीने सांगितलेले काम वेळेत पूर्ण करणे क्रमप्राप्त असते. कंत्राटी कर्मचार्यांना विशेषत: तासानुसार (Clock Hourly Basis) किंवा प्रकल्पाच्या आधारावर (Project Based) पैसे दिले जातात. यात कर्मचाऱ्याला कुठल्याही सरकारी कामगार सुविधा मिळत नाहीत.
नियोक्ते प्रकल्पाच्या आवश्यकतांच्या आधारे त्यांचे कर्मचारी सहजपणे नेमू शकतात. जेव्हा कामाची मागणी वाढते तेव्हा ते तात्पुरते कामगार ठेवू शकतात आणि कामाचा ताण कमी झाल्यावर त्यांना कामावरून काढू देखील शकतात. म्हणजेच काय तर काम संपले की कामगारांचे कंपनीत काहीही काम उतर नाही. याचा थेट परिणाम कामगाराच्या आर्थिक परिस्थितीवर होतो. कुटुंबाची हेळसांड होते आणि सामजिक आणि आर्थिक पत देखील खालावते.
कंत्राटी कामगारांना बर्याचदा आरोग्य विमा, सेवानिवृत्तीचे योगदान आणि ओवर टाईम यासारख्या स्थायी कर्मचार्यांना लाभ मिळत नाहीत.
खरे तर याचा परिणाम कामावर देखील जाणवतो. कंत्राटी कामगार असेच वरचे वर बदलत गेले तर नव्याने आलेल्या कामगारांना पुन्हा प्रशिक्षित करावे लागते आणि त्यांच्यावर वेळ खर्च करावा लागतो. याचा परिणाम उत्पादकतेवर होताना दिसतो. सध्या शिक्षण क्षेत्रात, बँकिंग क्षेत्रात, सरकारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कंत्राटीकरण सुरु आहे. सुशिक्षित लोक या पद्धतीच्या रोजगाराचा विरोध करताना दिसत आहेत.
कायमस्वरूपी रोजगार
कायमस्वरूपी कर्मचार्यांना ठराविक पगार आणि फायदे मिळतात, ज्यामुळे नियोक्त्यांना कामगार खर्चाचा अंदाज येतो, आर्थिक नियोजनासाठी हे फायदेशीर ठरू शकते.
कायमस्वरूपी नियुक्त झालेले कर्मचारी सरकारी योजनांचे फायदे मिळवण्यास पात्र असतात. सरकारी नोकरीत तर वेतन आयोगाची देखील तरतूद आहे. वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना उत्तम स्वरूपाचा पगार मिळतो.
नोकरीची सुरक्षा आणि दीर्घकालीन स्थिरतेचा फायदा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना होताना दिसतो, त्यामुळे दरमहा येणाऱ्या पगाराचे आर्थिक नियोजन हे कर्मचारी करू शकतात. हे कर्मचारी आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात आणि त्याचा परीणाम त्यांच्या कामावर देखील पाहायला मिळतो. अधिक क्षमतेने हे कर्मचारी काम करताना दिसतात.
तसेच कायमस्वरूपी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पगारी रजा, मेडिकल रजा घेता येतात. कंत्राटी कामगारांच्या बाबतीत असा नियम नाहीये. तसेच कायमस्वरूपी कर्मचारी संघटन बांधणी करू शकतात, संप करू शकतात, आपल्या मागण्यांसाठी नियोक्त्यांवर दबाव आणू शकतात, कंत्राटी कामगारांच्या बाबतीत असा कुठलाही अधिकार त्यांना नाही. त्यामुळे सध्याच्या काळात कंत्राटी रोजगाराला विरोध वाढताना दिसतो आहे.