Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

तुमच्या खिशावर होणार परिणाम; आजपासून लागू झालेले आर्थिक बदल वाचलेत का?

Changes From 1st August 2022

ऑगस्टच्या याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होईल. महागाईचा उडलेला भडका पाहता RBI यावेळी देखील व्याजदरात वाढ करण्याची शक्यता अधिक आहे. परिणामी सर्वच प्रकारची कर्जे महागतील. त्याशिवाय अनेक महत्वाचे आर्थिक बदल ऑगस्टमध्ये पाहायला मिळतील. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.

पहिल्याच दिवशी सिलिंडर झाला स्वस्त

पेट्रोलियम कंपन्यांनी आज 1 ऑगस्ट 2022 रोजी व्यावसयिक वापराच्या 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या (Commercial LPG Price Cut By Companies) किंमतीत 36 रुपयांची कपात केली. यामुळे खाद्यपदार्थ विक्री करणारे छोटे व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिकांना किंचित दिलासा मिळाला. या कपातीनंतर मुंबईत 19 किलोचा सिलिंडर 1936.50 रुपये इतका झाला असून दिल्लीत तो 1976 रुपये आहे. घरगुती वापराचा 14.2 किलोचा सिलिंडर मात्र 1,052.50 रुपयांवर स्थिर आहे. 

ITR साठी मुदतवाढ नाहीच 

वैयक्तिक आयकर भरणा करण्याची मुदत अखेर रविवारी 31 जुलै 2022 रोजी संपुष्टात आली. केंद्र सरकारने मुदतवाढ न दिल्याने आता ज्यांनी रिटर्न फाईल केला नाही, अशा टॅक्सपेअर्सना विलंब शुल्कासह ITR भरावा लागणार आहे. 31 डिसेंबर 2022 पर्यंत करदात्यांना ITR भरता येईल.

बँक ऑफ बडोदाची नवी सेवा

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने आपल्या दैनंदिन कामात पॉझिटिव्ह पे सिस्टम आजपासून म्हणजेच 1 ऑगस्ट 2022 पासून लागू केली. बँकेच्या ग्राहकांना 5 लाखांहून अधिक रकमेचे चेक इश्यू करताना ज्या व्यक्तीच्या नावे चेक इश्यू करत आहेत त्याचा तपशील द्यावा लागेल. या माहितीची बँकेकडून खातरजमा झाल्यानंतरच हा चेक क्लिअर होईल, असे बँकेनं म्हटलं आहे. या यंत्रणेला BOB Positive Pay System म्हणून ओळखले जाईल.

पोस्टाची डोअरस्टेप बँकिंग सेवा महागली 

आज 1 ऑगस्ट 2022 पासून पोस्ट पेमेंट बँकेच्या डोअर स्टेप बँकिंग सेवेसाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागतील. भारतील टपाल विभागाच्या (पोस्ट डिपार्टमेंट) डोअरस्टेप बँकिंगच्या प्रत्येक सेवेसाठी २० रुपये अधिक जीएसटी, असे शुल्क ग्राहकांकडून वसूल केले जाणार आहे.  

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, ई-केवायसी केले का? 

केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेत (PM-KISAN)लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलै 2022 या तारखेपर्यंत ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्याची मुदत होती. या प्रक्रियेला मुदतवाढ न मिळाल्याने ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल त्यांना आर्थिक लाभापासून मुकावे लागेल. लवकरच केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा १२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.

आता मतदान ओळखपत्र आधारशी संलग्न करा

पॅन-आधार जोडणीनंतर आजपासून मतदान ओळखपत्र आधार कार्डशी संलग्न करण्याची मोहीम सुरु झाली आहे. मतदारांना मतदानाचे ओळखपत्रावरील क्रमांक (Voter ID Card)त्यांच्या आधार क्रमांकाशी (Aadhaar Card) जोडता येईल. ही विशेष मोहीम महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांमध्ये सुरु झाली आहे. यातून राष्ट्रीय पातळीवर निवडणूक आयोगाला मतदार यादी तयार करणे सोपे जाणार आहे.

'एचडीएफसी'चे कर्ज महागले

हाऊसिंग फायनान्स क्षेत्रातील कंपनी 'एचडीएफसी'ने (HDFC Hike Interest Rate) कर्जदरात 0.25% वाढ केली आहे. नवीन सुधारित व्याजदर 1 ऑगस्ट 2022 पासून लागू झाल्याचे कंपनीनं म्हटलं आहे. या दरवाढीनंतर 'एचडीएफसी'चा कर्जदर हा 7.80% ते 8.30% या दरम्यान, असेल असे एचडीएफसीनं जाहीर केलं आहे.