Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financially Aware Kids: देवून थोडासा 'पॉकेट मनी' छान, मुलांना शिकवा अर्थभान

Financial awarness

Financially Aware Kids: लहान लहान म्हणत आपण बऱ्याचदा लहान मुलांना योग्य वयात काही महत्त्वाच्या गोष्टी शिकवायच्या विसरून जातो. ज्या मुलांना खर्च करायचा समजतो त्या मुलांना बचत आणि गुंतवणूक करणे समजायला नको का? तेव्हा योग्य वयात मुलांना त्यांना समजेल अशा पद्धतीने'अर्थसंस्कार' द्यावे.

8 वर्षांचा आराध्य आज पुन्हा फुटबॉल किटसाठी हट्ट धरून बसला होता. आई आपलं म्हणणं ऐकत नाही म्हणून तो एकीकडे चिडचिड तर करत होताच तर दुसरीकडे कपाटाचा दरवाजा आपट, पुस्तक पसरवून ठेव अशा एक ना एक प्रकारे राग व्यक्त करत होता...

आता एकीकडे आराध्यची ही सगळी चिडचिड बंद होते ना होते तोच 4 वर्षाची लहानगी सौम्या शेजाऱ्यांकडे पाहिलेल्या इलेक्ट्रॉनिक ट्रेनसाठी रडू लागली होती. स्वयंपाकाच्या गडबडीत असलेल्या आईचा आता संयम सुटू लागला होता. तेवढ्यात सौम्याने रडत खेळणी फेकायचा अवकाश आणि आईचा पारा चढला . "पैसे काय झाडाला झाडाला लागतात काय" ? असा सूर चढवून ती पुढचे बोलणे सुरू करणार तेवढ्यात दारात येऊन उभी राहिलेली श्रेया "हो तर आमच्याकडे आहे पैशांचे झाड. सौम्या आराध्याकडे नाही का?" असे लडिवाळपणे बोलत आत आली. दोघा मुलांच्या हातात चॉकलेटचे बॉक्स ठेवून ती किचनकडे वळाली. मावशीकडून मिळालेला खाऊ बघून आराध्य सौम्याचे रडू कुठल्या कुठे पळाले. आता दोघेही आत त्यांच्या खोलीत जाऊन खेळू लागले. 

Article
एव्हाना आईचा मूड चांगलाच बिनसला होता. " अगं ताई किती चिडचिड करशील मुलांवर? असे म्हणत श्रेयाने ताईला शांत करायचा प्रयत्न केला. आईनेही लगेच आपले मन मोकळे करत महिन्याचा खर्च, मुलांच्या फी, त्यांचे दवाखाने, घरातील ने -आण,  हे सर्व करताना आपली होणारी ओढाताण सगळं एका दमात सांगून टाकलं. तेव्हा श्रेयाने ताईला शांत करत "अगं मुलच ती असले हट्ट करणारच " असे बोलत तिला समजावले. आपल्या ताईला समजावतांना श्रेयाने मुलांना आत्तापासूनच थोडे थोडे 'अर्थशिक्षण' दिले तर त्यांनाही पैशांचे मूल्य समजेल हे पटवून दिले. खर्च, बचत गुंतवणूक या गोष्टींची बेसिक माहिती देण्याची आणि आर्थिक शिस्त लावण्याची हीच योग्य वेळ आहे असेही तिने सांगितले. त्यासाठी तिने काही  उपायही सुचविले…

पॉकेट मनी

साधारणतः आठ ते दहा वर्षाच्या मुलाला 'monthly pocket money 'सुरू करायला काहीच हरकत नाही. जेंव्हा तुम्ही मुलांना 'पॉकेट मनी' देता तेंव्हा त्यांना तेवढा पैशातच त्यांचे महिन्याचे खर्च पुर्ण करायची सवय लागते.

खर्चाची डायरी

मुलांना पॉकेट मनी दिल्यानंतर त्यांना दैनंदिन किंवा आठवड्याच्या खर्चाच्या नोंदी करायला शिकवा यातून कुठला खर्च करणे योग्य आणि कुठला टाळणे योग्य याचे त्यांना आपसूकच ज्ञान मिळेल.

मोकळेपणाने चर्चा करा

कुटुंबाचे monthly बजेट, महत्त्वाचे खर्च, कर्जाचे हप्ते यांविषयी मुलांशी हळूहळू चर्चा करायला सुरुवात करा.मोकळेपणाने केलेल्या चर्चांमधून त्यांना बरेच आर्थिक बारकावे समजतील . 

सेव्हींग अकाउंट

मुलांच्या नावाने स्वतंत्र सेव्हींग अकाउंट ओपन करा. आपण दर महिन्याला खात्यात टाकलेले पैसे आणि त्यात होत चाललेली वाढ याचा आनंद त्यांना घेऊ द्या.

बँकेला व्हीजीट

महिन्यातून एकदा तरी मुलांना बँकेत घेऊन जा. जेणेकरून त्यांना आर्थिक व्यवहारांची (पैसे जमा करणे, काढणे, स्लिप भरणे) कल्पना येईल.

बिझनेस गेम

'बिझनेस गेम' सारखे खेळ मुलांबरोबर खेळून तुम्ही त्यांना व्यवहार ,देवाणघेवाण यांबद्दल सजग करू शकता.

आर्थिक ध्येय

आपल्या कुटुंबाची आर्थिक ध्येय काय आहेत आणि त्यासाठी आपण कुठले डिसिजन घेतो आहोत हे मुलांनाही समजू द्या. यातून आर्थिक प्रगल्भता येण्यास मदतच होईल.