तुम्ही पगारदार, नोकरदार किंवा व्यावसायिक असाल तर तुमच्यासाठी 31 जुलै, 2023 ही खूप महत्त्वाची तारीख आहे. कारण मूल्यांकन वर्ष 2023-24 आणि आर्थिक वर्ष 2022-23 (Assessment Year 2023-24 & Financial Year 2022-23) साठीचे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. तुम्हाला फॉर्म 16 (Form 16) मिळाला असेल किंवा नसेल तरीही 31 जुलैपूर्वी आयटीआर (Income Tax Return-ITR) भरा. अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नसल्याने ते आयटीआरमधून मिळणाऱ्या फायद्यांपासून वंचित राहत आहेत. तर आज आपण समजून घेणार आहोत की, आयटीआर हा कोणी भरला पाहिजे. त्याचा मिळणाऱ्या पगाराशी काही संबंध आहे का? पगार कमी असेल तर आयटीआर भरले नाही तर चालते आणि पगार जास्त असेल तर आयटीआर भरावे लागते? अशाप्रकारचा संभ्रम अजूनही लोकांमध्ये आहे. पण नियमित इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे अनेक फायदे आहेत. त्या फायद्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे फायदे
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे आणि वेळेत भरण्याचे अनेक फायदे आहेत. आज आपण अशाच फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत.
कर्ज आणि क्रेडिट कार्डसाठी उपयोगी
बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी आणि उत्पन्नाचा पुरावा म्हणून ITR चा वापर होतो. होम लोन किंवा कार लोन घ्यायचे असेल तर बँका अर्जदारांकडून मागील 3 वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याची पावती मागते. आयटीआर भरल्याची तुमच्याजवळ पावती असेल तर कर्ज मिळणे सोपे होते. कर्जाप्रमाणेच क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी ITR चा वापर होतो. बँका आयटीआरमधून ग्राहकाची कर्ज घेण्याची आणि परतफेड करण्याच्या क्षमतेचे आकलन करतात.
मोठ्या व्यवहारांसाठी आवश्यक
ज्याप्रमाणे सेव्हिंग खात्यात 50 हजारांवरील रक्कम भरण्यासाठी पॅनकार्ड उपयोगी ठरते. त्याप्रमाणे जास्त रकमेचा व्यवहार केल्यास आयटीआर फायद्याचे ठरते. प्रॉपर्टीची खरेदी-विक्री केल्यानंतर ती माहिती आयटीआरद्वारे सरकारपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. यामुळे इन्कम टॅक्स विभागाकडून नोटीस येण्याचा धोका टळू शकतो.
वेळेत आयटीआर भरल्यास दंडातून सूट
31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरणे आवश्यक आहे. त्यानंतर आयटीआर भरल्यास संबंधिताला 10 हजारांचा दंड भरून आयटीआर भरावे लागते. नाहीतर तु्म्हाला इन्कम टॅक्स विभागाची नोटी येऊ शकते.
टीडीएस क्लेमसाठी आवश्यक
जर एखाद्या संस्थेने किंवा एनजीओने तुम्हाला टीडीएस कापून पेमेंट केले असेल तर तो कापलेला टीडीएस मिळवण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return-ITR) भरणे आवश्यक आहे. फ्रीलान्सिंग किंवा घरून काम करणाऱ्या व्यक्तींचे उत्पन्न करपात्र नसले तरी त्यांना टीडीएस कापून पेमेंट दिले जाते आणि ते कापलेले पैसे परत मिळवण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरून टीडीएस रिफंडचा क्लेम करावा लागतो.
व्हिसा मिळवण्यासाठी
व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने परदेशात जायचे असेल तर पासपोर्ट ऑफिसकडून आयटीआर भरल्याची पावती मागितली जाते. बऱ्याच काऊन्सिलेटमधून व्हिसासाठी अॅप्लाय केल्यावर मागील 2 वर्षांचे भरलेले आयटीआर मागितले जातात. आयटीआर असेल तर व्हिसा मिळणे सोपे जाते.
वास्तव्याचा पुरावा
इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याची पावती हा वास्तव्याचा कायदेशीर पुरावा मानला जातो. याचा बऱ्याच सरकारी कामांमध्ये वापर केला जातो. आधारकार्ड काढण्यासाठी किंवा पासपोर्ट बनवण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्नचा वास्तव्याचा पुरावा म्हणून वापर करता येतो.
इन्शुरन्ससाठी
जर तुम्हाला 1 कोटी रुपयांचा इन्शुरन्स प्लॅन घ्यायचा असेल तर इन्शुरन्स कंपन्यांकडून ITR मागितला जाऊ शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न हा उत्पन्नाचा स्त्रोत जाणून घेण्याचा एक मार्ग आहे.