आर्थिक वर्ष 2022-23साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. आरटीआर फाईल करण्याची पद्धत सोपी झाली असली तरीही करदात्यांनी त्यांच्या उत्पन्नाची माहिती अचूकपणे आणि योग्य तपशीलांसह भरणे आवश्यक आहे. उत्पन्नाच्या चुकीच्या माहितीबाबत सरकारकडून सूचना जारी करण्यात आली आहे. आयकर कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत कर दात्यांनी आयटीआर भरणे आवश्यक आहे. अन्यथा, चुकीची अथवा खोटी माहिती भरल्यास करदाता हा दंडात्मक कारवाई, कायदेशीर खटला अथवा तुरुंगवासाच्या शिक्षेसही पात्र ठरू शकतो. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील मुख्य आयकर आयुक्त मिताली मधुस्मिता यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
दंडात्मक कारवाई अथवा तुरुंगवास
मिताली मधुस्मिता यांच्या मते आयकर कायदा, 1961 अंतर्गत, उत्पन्नाचा चुकीचा अहवाल देणे अथवा कर कपातीसाठी खोटी माहिती देणे, किंवा चुकीच्या पद्धतीने रिफंड मिळवणे हा गंभीर गुन्हा ठरू शकतो. यामध्ये दोषी करदात्यास देय कराच्या रकमेवर 12 टक्के वार्षिक व्याजदर, देय कराच्या 200 टक्के इतका दंड आणि संभाव्य कायदेशीर खटला चालवला जाऊ शकतो. त्यामुळे प्रसंगी तुरुंगवास देखील होऊ शकतो.
चूक सुधारून घ्या
ज्या करदात्यांनी आधीच असे दावे केले आहेत आणि आयकर विभागाकडून चुकीच्या पद्धतीने रिफंड मिळवला आहे. त्या करदात्यांनी मूल्यांकन वर्ष 2021-22 आणि मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी अद्ययावत रिटर्न्स अंतर्गत 139(8A) दाखल करावे. तसेच ते कलम 140B नुसार नियमानुसार जी काही देय कराची रक्कम आहे ती भरून चूक सुधारून घेऊ शकतात. तसेच मूल्यांकन वर्ष 2023-24साठी कर दात्यांनी मूळ रिटर्न आधीच दाखल केले असेल तर अशा परिस्थितीत ते कलम 139(5) नुसार सुधारित रिटर्न दाखल करू शकतात असेही मधुस्मिता यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारकडून कारवाईसाठी सक्षम यंत्रणा
याव्यतिरिक्त, सरकारने कर परताव्याच्या फसव्या दाव्यांचा सामना करण्यासाठी आपली यंत्रणा अधिक सक्षम केली आहे. जे करदाते कर प्रणालीची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात, अशा व्यक्तींना ओळखून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी करदात्यांना उत्पन्नाची माहिती भरताना सावधगिरी बाळगण्याची आणि त्यांच्या प्राप्ती करासाठीचे दावे अचूकपणे सुनिश्चित करावेत, असा सल्लाही आयकर विभागाकडून देण्यात आला आहे.
आवश्यक कागदपत्रे
आयकर रिटर्न यशस्वीरित्या भरण्यासाठी, करदात्यांना विविध कागदपत्रे प्रदान करणे आवश्यक आहे. या कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म 16, फॉर्म 16A, 16B, 16C, बँक स्टेटमेंट्स, फॉर्म 26AS, गुंतवणुकीचे पुरावे, भाडे करार, विक्री करार आणि लाभांश वॉरंट यांचा समावेश असू शकतो. फॉर्म 26AS, जो प्राप्तिकर पोर्टलवरून डाउनलोड करता येईल. करदात्याच्या वार्षिक कर विवरणाच्या तपशीलासाठी हा फॉर्म महत्त्वाचा आहे.