देशातील गहू आणि तांदळाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ (Food Corporation of India- FCI) 12 जुलै रोजी ई-लिलाव करणार आहे. लिलावाची ही तिसरी फेरी असून या लिलावात बफर स्टॉकमधून 4.29 लाख टन गहू आणि 3.95 लाख टन तांदळाची विक्री केली जाणार आहे. सरकार देशांतर्गत पुरवठा सुधारण्यासाठी आणि तांदूळ, गहू आणि पिठाच्या किरकोळ किमती नियंत्रित करण्यासाठी हा लिलाव करत आहे. या माध्यमातून सरकार मोठ्या प्रमाणात ग्राहकांना खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (OMSS) स्टॉकमधून गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देत आहे.
लिलावाची तिसरी फेरी-
ई-लिलावाच्या तिसऱ्या फेरीत, FCI देशभरातील 482 डेपोमधून 4.29 लाख टन गहू आणि 254 डेपोमधून 3.95 लाख टन तांदळाचा लिलाव करेल. यासंदर्भात एफसीआयने निविदा काढल्या आहेत. इच्छुक व्यावसायिक या ई-लिलावात सहभागी होऊ शकतात. यामध्ये लहान किरकोळ व्यापार्यांना देखील सहभागी होता येणार आहे. ज्यामुळे जनतेला सहजपणे मोठ्या प्रमाणात गहू तांदूळ उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे अन्न पुरवठा मंत्रालयाकडून देण्यात निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, लिलावात सहभागी होण्यासाठी व्यापार्यांना व्हीट स्टॉक मॉनिटरिंग सिस्टम पोर्टलवर (गहू साठा निरीक्षण यंत्रणा) नोंदणी करणे अनिवार्य आहे.
आधारभूत किंमत स्थिर
मागील 5 जुलै रोजी झालेल्या ई-लिलावात एकूण 1.29 लाख टन गव्हाचा लिलाव करण्यात आला होता. त्यामध्ये 1,337 व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग घेत गव्हाची खरेदी केली होती. तसेच 170 टन तांदळाचा लिलाव करत 5 बोलीदारांना तो विकण्यात आला होता. गव्हाची आधारभूत किंमत सध्याच्याच पातळीवर स्थिर ठेवण्यात आली आहे. फेअर अॅव्हरेज क्वालिटी (FAQ) साठी प्रतिक्विंटल 2150 रुपये आणि अंडर रिड्यूज स्पेसिफिकेशन (URS) गव्हासाठी प्रतिक्विंटल 2125 रुपये. तर तांदळाची राखीव किंमत 3173 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे.
या लिलाव प्रक्रियांमध्ये खरेदीदारास कमाल मर्यादा 100 मेट्रिक टनापर्यंत आहे. याचबरोबर छोटे गहू विक्रेते आणि व्यापार्यांना सामील करून घेण्यासाठी किमान 10 मेट्रिक टन गहू विकत घेण्याची मर्यादा ठेण्यात आली आहे. तसेच या लिलावात लहान व्यापार्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी अर्नेस्ट मनी डिपॉझिट मर्यादा पूर्वीच्या स्तरांपेक्षा 50 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे.