आई-वडील आपल्या मुलांना सर्व सुखसोयी मिळाव्यात म्हणून धडपडत असतात. विशेषतः मुलांना न सांगता त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्याही नकळत आर्थिक गुंतवणूक (Financial Investment) करून त्यांचे पुढील आयुष्य सुखात जावे यासाठी प्रयत्न करत असतात. मुलं आपल्या आईसोबत जेवढ्या मोकळेपणाने बोलतात तेवढा मोकळेपणा बाबांसोबत बोलताना नसतो. पण हे चित्र आता बदलत आहे; अहो बाबांचा ए बाबा झाला आहे. मुलं आणि बाबा यांचं नातं मैत्रीचं होत आहे. दोघांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झाल्याने सगळ्या विषयांवर सुसंवाद होत आहे. वर्ल्ड फादर्स डे (World Father's Day 2022) निमित्त आज आपण मुलं आणि वडिल यांच्यातील आर्थिक नात्यांविषयी अधिक जाणून घेणार आहोत.
कुटुंबातील फक्त मोठ्या सदस्यांचीच नाही तर मुलांचीही आर्थिक विषयातील मतं जाणून घेणं गरजेचे आहे. कारण बचत, गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहाराचे प्रकार दिवसेंदिवस बदलत आहेत. आधुनिकीकरणामुळे सर्वच माध्यमं कमी वेळात अधिक सुविधा देत आहेत. अशावेळी वडिलांचा अनुभव आणि मुलांचे शिक्षण यांची सांगड घालून वडील आणि मुलांचं आर्थिक नातं घट्ट होऊ शकत. यासाठी वडिल आणि मुलं या दोन्ही बाजूने प्रयत्न होणे गरजेचे आहे. वडील आपल्या मुलांना त्यांच्या आर्थिक प्रवासात कशी मदत करू शकतात, ते आपण पाहणार आहोत.
आर्थिक निर्णयांत मुलांचे मत घ्या
बऱ्याच घरांमध्ये आपण पाहतो की आई-वडील मुलांसमोर आर्थिक व्यवहारांबाबत बोलत नाहीत किंवा लहानपणापासून मुलाला घरातील पैशांच्या व्यवहारापासून दूर ठेवले जाते. विशेषत: वडिल आपल्या व्यवहारांबाबत कधीच मुलांशी बोलत नाहीत. मात्र, पैशांची कशाप्रकारे बचत केली पाहिजे, याचे शिक्षण त्यांना देणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनातील आर्थिक निर्णय आणि व्यवहार याचा संबंध मुलांना समजावून सांगितला पाहिजे. असे केल्याने मुलांना घरातील खर्चाचा अंदाज येतो. तसेच भविष्यात मुलांवर एखादा निर्णय घ्यायची वेळ आली तर मुलांना सक्षमपणे निर्णय घेणे सोपे जाते.
संपत्तीची माहिती मुलांना द्या
वडिलांनी आणि मुलांनी कोणताही आर्थिक व्यवहार करताना किंवा गुंतवणूक, विमा घेताना एकमेकांची मत घेऊन पैसे गुंतवणे गरजेचे आहे. कारण अचानक पैशांची गरज भासल्यास कुठून पैसे तात्काळ मिळू शकतील याची माहिती दोघांनाही असेल. तसेच व्यवहारासंबंधीची, कागद्पत्रांची माहिती फक्त वडील किंवा मुलालाच नाहीतर संपूर्ण कुटुंबाला माहित असणे गरजेचे आहे. तसेच आपल्या व्यवहारातून लाभ कसा मिळवायचा, त्याची प्रक्रिया मुलांना समजावून सांगावी. तसेच कुटंबावर एखादे कर्ज असेल तर त्याचीही माहिती मुलांना असणे गरजेचे आहे.
कौशल्यं विकसित करा
मुलांमध्ये उद्योग कौशल्य विकसित व्हावे या दृष्टीकोनातून विशेष प्रयत्न करायला हवेत. योग्य माहिती आणि अंगभूत कौशल्यांच्या आधारे निर्णय घेता यावेत यासाठी त्यांच्यातील उद्यमशीलता विकसित केली पाहिजे. मुलांना स्वत:ची ओळख निर्माण करण्याची संधी दिली पाहिजे. यात मुलांना वास्तवाची जाण करून देत उद्योग किंवा व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
वडील आणि मुलांचं नातं हे वेगवेगळ्या परिस्थितीत बदलत असते. पण गरजेच्या वेळी तात्काळ आर्थिक मदतीची गरज आपल्या कुटुंबाला असते. अशावेळी आपल्या आर्थिक व्यवहारांची माहिती आपल्या मुलांना पर्यायाने कुटुंबाला असणे गरजेचे असते.