Farming Idea: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याच्या दक्षिणेला 2200 ते 2300 नागरिकांची लोकवस्ती असलेलं पात्रेवाडी हे एक गाव आहे. अतिशय कमी पाऊस होत असल्याने या गावातील कोरडवाहू. खरीप आणि रब्बी हंगामातील ज्वारी, बाजरी एवढीच काय ती कडधान्यं शेतकऱ्याच्या हाती यायची. अनेकांना तर दुसऱ्यांच्या शेतात मजुरीशिवाय पर्याय नव्हता. मात्र इतर गावातील शेतकऱ्यांची फुललेली शेती बघून पात्रेवाडीतील शेतकऱ्यांना आपल्याही गावात शेती फुलावी, असे वाटू लागले. त्यानंतर 1995 पासून डाळिंबाच्या गणेश वाणाच्या पिकाची लागवड शेतात केली जात आहे.
दुष्काळाने दिली शिकवण
1995 पासून डाळिंबाच्या गणेश वाणाच्या पिकाची लागवड शेतात केली जात आहे. पाण्याची समस्या जाणवली तर शेतकरी शेतीला ट्रँकरने पाणी पूरवत असे. मात्र 2003 मध्ये भयंकर दुष्काळ पडला आणि येथील शेतकरी वर्ग परत जागा झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेतून पाझर तलाव तयार करण्यासाठी कार्य सुरु केले. सद्य स्थितीत 3 पाझर तलाव गावात आहे.
कशी करावी लागवड?
पात्रेवाडी गावातील शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या शेतीचा संपूर्ण अभ्यास केला आणि परत एकदा डाळिंबाचे पिक घ्यायचे निश्चित केले. यासाठी आधी नांगरणी करुन शेत सपाट करण्यात आले. त्यानंतर त्यात शेणखत घालून 13 बाय 8 फुटावर डाळिंबाची लागवड करण्यात आली. प्रत्येक तीन महिन्यानी गोमुत्र, शेणखत, लेंडीखत किंवा सरीअमृत यासारख्या कुठल्याही एक सेंद्रिय खत बागेला दिले जाते. तसेच फळबागेला गरजेनुसार पाणी घातल्या जाते. डाळिंबाचे पहिले पिक 19 महिन्यानंतर हाताशी लागते. त्यानंतर प्रत्येक 4 महिन्यानी डाळिंबाची छाटनी करावी लागते. या पिकाला गरजेनुसार आणि अभ्यास करुन पाणी द्यावे लागते. तेव्हाच त्याला चांगला बहार येतो, अशी माहिती शेतकरी बळिराम देवकर यांनी दिली.
विक्री आणि नफा
एक एकरला अंदाजे 9 टन एवढे उत्पन्न मिळते. त्यापासून 10 ते 12 लाख रुपये नफा होतो. डाळिंब खरेदी करण्यासाठी व्यापारी बागेत येतात. माल तपासून बोली लावून जातात. कधी 125 रुपये किलो, कधी 110 रुपये किलो, तर कधी 198 रुपये किलो एवढा भाव मालाला मिळतो, असे शेतकरी बळिराम देवकर सांगतात.