German Farming Technology: चंद्रपूरच्या मुल येथे राहणारे सुमित सुरेशराव समर्थ यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय हा इलेक्ट्रीकल कॉन्ट्रक्टरचा आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून ते 20 एकर जमिनीवर शेती करीत आहे. यामध्ये फळबागे सोबतच, शेवग्याच्या शेंगा, कुकुटपालन, मत्स्यपालन यासारखे जोडधंदे देखील सुमित यांनी सुरु केले आहे. त्यांनी त्यांच्या फळबागेत आंबा, सिताफळ, चिकू, फणस, पेरु या फळांची लागवड केलेली आहे. शेती करण्याची पारंपरिक पद्धत बाजुला सारुन जर्मन तंत्रज्ञान पद्धतीने शेती करण्याचा मार्ग त्यांनी अवलंबला आहे आणि या माध्यमातून भरपूर नफा मिळत असल्याचे सुमित सांगतात.
Table of contents [Show]
जर्मन तंत्रज्ञान शेती पद्धत आवडली
चंद्रपूर येथील चिचकोटी येथे वडिलोपार्जित शेती आहे. तेथे देखील आधी पारंपारिक पद्धतीने शेती होत असे, मात्र नफा काही जास्त मिळत नव्हता. मला शेतीची नेहमीच ओढ होती. त्यामुळे मी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करीत असे. तेथील जमीन फार सुपीक नाही, पावसाची समस्याही आहे, तरीदेखील तेथील लहानातला लहान शेतकरी सधन आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शेती करण्याची यशस्वी पद्धत बघून मला फार प्रोत्साहन मिळाले. मग मी भारतीय, इस्त्राइल आणि जर्मन अशा तीन राष्ट्रांच्या शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. त्यामध्ये मला जर्मन तंत्रज्ञान पद्धतीने शेती करणे जास्त योग्य वाटले, अशी माहिती सुमित यांनी दिली.
जर्मन तंत्रज्ञान शेती पद्धतीचे महत्व
जर्मन तंत्रज्ञान पद्धतीमध्ये कोणत्याही पिकांच्या दोन झाडांच्या लागवडीमधील अंतर हे 15 बाय 7.5 फूट असे असते, त्यामुळे झाडाला भरपूर सुर्यप्रकाश आणि पोषक असे वातावरण मिळते. जर्मन पद्धतीमध्ये कुठलेही झाड हे जास्त मोठे होऊ द्यायचे नसते. योग्य प्रमाणात उंची असलेल्या झाडांमध्ये फळांची प्रत चांगली येते. तर झाडावरील फळे ही शिडी लावून हाताने तोडता यावीत, एवढीच झाडांची उंची असते. यामुळे फळ काठीने किंवा इतर साहित्याने तोडण्याची गरज नाही. याशिवाय पिकलेली फळे खाली पडून खराब होण्याचा धोका राहात नाही. त्यामुळे संपूर्ण पीक तुमच्या हाती येते, असे जर्मन तंत्रज्ञानाचे महत्व सुमित यांनी सांगितले.
मुरमाड जमिनीवर फुलवली फळबाग
सुमित यांनी जुलै 2022 मध्ये डोंगराच्या पायथ्यालगतची अतिशय मुरमाड, पडीक अशी जमीन 6 लाख रुपये एकर दराने विकत घेतली. कमी दराने घेतलेला या 20 एकर जमिन लागवड योग्य करण्यास त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागली. या ठिकाणी त्यांनी पाण्याच्या सोयीसाठी एक विहीर खोदली. उन्हाळ्यात विहिरीचे पाणी आटते म्हणून बोअरवेल घेतला. तसेच पाण्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी त्यांनी शेतात ठिंबक सिंचन केले. मुरमाड जमीन असल्याने त्यांनी झाडांसाठी अडीच फूट खोल खड्डे केले. त्यांना संपूर्ण पीक हे सेंद्रीय पद्धतीने घ्यायचे असल्याने त्यांनी खड्ड्यात कपोष्ट खते टाकून फळझाडांची लागवड केली..
शेतीपूरक व्यवसायाची जोड
20 एकर शेती पैकी साडेबारा एकर जमिनीवर फळबाग लावण्यात आली आहे. तर दीड एकर जमिनीवर शेवग्याच्या शेंगांचे पीक घेतले आहे. तर उरलेल्या जमिनीवर कुकुटपालन (गावठी कोंबडी), मत्स्यपालन या सारखे पूरक जोडधंदे सुरु केले आहेत. बहुपर्यायी पीक आणि जोडधंद्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच भविष्यात याच शेतीवर कृषी पर्यटन (Agro Tourism) सुरु करण्याचा सुमित यांचा मानस आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शेती करणाऱ्यांनी अशा प्रकारच्या बहुपर्यायी आर्थिक स्त्रोतांची निर्मिती करणे काळाजी गरज आहे.
फळबागेत हजारोच्या संख्येने झाडे
सुमित यांच्या फळबागेत NMK सिताफळाची 1000 झाडे, केशरआंबा, दशेरी आणि लंगडा आंबा असे मिळून आंब्याची एकूण 1000 झाडे आहेत. कापा फणसाची 450 झाडे आणि कालीपत्ती, क्रिकेटबॉल जातीच्या चिकूची 450 झाडे. तसेच पेरुची 700 झाडे आहेत. पूढील दोन महिन्याच पेरुच्या झाडांचे पिक हाताला मिळेल. मशागत आणि इतर सर्व एकूण खर्च मिळून या दोन वर्षात सुमित यांना 15 लाख रुपये खर्च आला. परंतु येणाऱ्या तीन वर्षात यामधून 30 लाख रुपये नफा मिळेल, असा पूर्ण विश्वास त्यांना आहे. फळबागेची शेती करताना तुम्हाला सुरुवातीचे दोन वर्ष जास्त खर्च येतो. कारण ही पिके एकदाच लावावी लागतात. त्यानंतर केवळ फवारणी आणि मजुरांचा खर्च येतो. पूढे तुम्हाला याच फळबागेच्या माध्यमातून अनेक वर्ष नफा मिळत जातो, अशी माहिती सुमित यांनी दिली.
शेतकऱ्यांना दिला संदेश
तर सुमित यांनी जुलै 2022 मध्ये शेवग्याच्या शेंगांचे पिक घेतले होते. साडेचार महिन्यात या झाडांना 150 ते 200 शेंगा याप्रमाणे दोन वेळा बहार आला. यामाध्यमातून त्यांना 35 हजार रुपयांचा नफा झाला. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा काही तरी वेगळं करा. एकाच पद्धतीने शेती करीत असल्याने शेतकरी वर्ग मागे पडला. तसेच शेतीला पूरक असे व्यवसाय करा. महत्त्वाचे म्हणजे आपला 50 % माल शेतात किंवा गावातच विकला जाईल, अशी सोय करा. यामुळे वाहतुकीचा आणि ब्रोकरचा खर्च वाचतो त्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांबरोबरच शेतकऱ्याला देखील होतो, असा संदेश सुमित समर्थ यांनी तरुण शेतकऱ्यांना दिला.