Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Farming Idea: सेंद्रीय शेतीला संशोधनाची जोड; शिक्षक शेतकऱ्याने शोधलेला तांदळाचा "अक्षदा" वाण उत्पादनात अग्रेसर

Farming Iea

Farmer Vinod Rayte: नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील भूगाव येथे सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे शेतकरी विनोद रायते यांनी स्वत:च्याच शेतात अक्षदा नावाच्या तांदळाचं वाण शोधून काढलं आहे. गेल्या वर्षी त्यांना याच वाणाच्या माध्यमातून 100 क्विंटल उत्पन्न झालं होतं. ज्यामुळे त्यांना 5 ते 6 लाख रुपयांचा नफा झाला. विनोद रायते हे वर्षभर त्यांच्या शेतात वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न घेतात.

Crop of Akshada variety :  शेती ही अनेकजण करतात. त्यापैकी काही शेतकरी रासायनिक शेती करतात. तर काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करतात. रासायनिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेती पेक्षा सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचे फायदे अनेक आहेत. परंतु लवकर आणि अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी अनेकजण रासायनिक पद्धतीने शेती करण्याची कास धरतात. परंतु, नागपूर जिल्ह्यातील भूगाव येथे राहणाऱ्या विनोद रायते यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. 

सेंद्रीय पद्धतीने शेती-

भूगाव येथील खासगी शाळेमध्ये नोकरी करणाऱ्या विनोद रायते यांना शेती करण्याची आणि विविध प्रयोग करुन बघण्याची फार आवड होती. यासाठी त्यांनी टप्प्या टप्प्याने शेती विकत घेतली. गेल्या 14 वर्षांपासुन ते शेती करीत आहे. त्यांच्या शेतामध्ये तांदळा व्यतिरिक्त ऊस, सोयाबीन, ब्रोकली, हरभरा, तूर या पिकांचे देखील उत्पादन घेतले जाते. महत्त्वाचे म्हणजे वर्षभर संपूर्ण पिके हे केवळ सेंद्रीय पद्धतीनेच घेतली जातात. केवळ सेंद्रीय पद्धतीने शेती करीत असल्याने विनोद रायते यांच्या उत्पादन खर्चात मोठी घट झाली असून रायते यांना तालुका स्तरावर प्रगतीशील शेतकरी पुरस्काराने गौरवण्यातही आले आहे.

अधिक उत्पादन क्षमता असलेलं वाण

विनोद रायते हे आधी तांदळाच्या श्रीराम या वाणाचे पीक घेत होते. परंतु,  जमीन काळी कसदार आणि सुपीक असल्याने श्रीराम तांदळाचे पिक खूप जास्त उंच वाढायचे. त्यामुळे कापणीला माणसं मिळत नव्हती. यासर्व गोष्टींचे निरीक्षण करुन विनोद यांनी कमी वाढ होणाऱ्या अणि अधिक उत्पादन निघणाऱ्या तांदळाचे वाण शोधून काढले. हे वाण पूर्णपणे विकसित करून संकलित करण्याकरिता अनेक वर्ष त्यांनी एकाच वाणाची लागवड करून त्यातील निवडक चांगल्या वाणाची बियाणे म्हणून निवड केली. ज्यावेळी त्याची चांगली प्रत प्राप्त झाली तेव्हापासून त्यांनी म्हणजे आठ-दहा वर्षांपासुन केवळ कमी उंच वाढणाऱ्या   स्वत: विकसित केलेल्या  तांदळाचेच पीक घ्यायला सुरुवात केली. या वाणावर किडींचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. त्यामुळे या वाणाची उत्पादन क्षमता अधिक आहे.

अक्षदाचे पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न

प्रत्येक गावात बांधावर कृषी सहाय्यक फिरतात. ते पिकांची पाहणी करतात.  त्यावेळी रायते यांच्या शेतात कृषी सहय्यकांना कमी उंचीच्या तांदळाचे आगळे-वेगळे पीक दिसले.  100 ते 110 दिवसात हातात पिक मिळणाऱ्या या तांदळाची संपूर्ण माहिती घेत त्यांनी रायते यांची यशोगाथा जाणून घेतली. तसेच विनोद यांना या तांदळाच्या वाणाला एक नाव द्यायला लावले. त्यावेळी विनोद रायते यांनी या वाणाला अक्षदा असे नाव दिले.  त्यानंतर कृषी विभागाने या तांदळाच्या वाणाची  कृषी विभागाकडे  नोंद केली. दरम्यान विनोद आता या तांदळाचे पेटंट मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. 

अधिक नफा देणारा तांदूळ

अक्षदा या तांदळाचे गेल्या वर्षी 7 एकर मध्ये 100 क्विंटलचे उत्पादन झाले. मुख्य म्हणजे 1 लाख रुपयांचा उत्पादन खर्च जाऊन वार्षिक 5 ते 6 लाख रुपयांचा नफा झाला. यावर्षी हे वाण केवळ 4 एकरा मध्ये लावण्यात आले आहे.  ज्यांची शेती सुपीक आहे, त्यांनी या वाणाची लागवड करायला हवी. हा अत्यंत रुचकर असा तांदूळ आहे. पीक घेताना निसर्गाने साथ दिली तर 70 टक्के फायदा होतो. अक्षदा तांदळास बाजारात 60 रुपये किलोने भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हे जास्त आर्थिक नफा देऊ शकते, असा विनोद यांचा दावा आहे. तसेच  अक्षदा वाणाचा तांदूळ सुगंधित व्हायला पाहिजे यासाठी गांढूळ खतात काही नॅचरल सुगंधित द्रव्ये मिक्स करुन प्रयोग सुरु केला आहे.  अशी माहिती विनोद यांनी दिली.

सेंद्रीय खतांचा वापर फायद्याचा-

विनोद यांच्या शेतामध्ये यावर्षी ऊस, चना, सोयाबिन, तूर आणि काही प्रमाणात भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. या संपूर्ण पिकाला ते शेणखता बरोबरच गांढूळ खत देखील पुरवतात. गांढूळ खत निर्मिती स्वत:च्याच शेतात करतात. त्यांच्याकडे एक गावरान गाय, बैल आणि बछडे आहेत. सेंद्रिय खतांचा वापर करण्यास लागणारे गोमुत्र, शेण, पालापाचोळा, इत्यादी गोष्टी या शेतातच उपलब्ध होत असल्याने दुकानामधून खते विकत घेण्याचा खर्च वाचतो. शिवाय जमिनीचा पोत सुधारतो. यामुळे पिकांची गुणवत्ता सुधारुन पिके अधिक चांगले येतात. 

सोशल मार्केटिंग देते लाभ

मुख्य म्हणजे विनोद रायते त्यांच्या शेतातील माल कृषी उत्पन्न समिती मध्ये विकायला नेत नाहीत अथवा कुठल्या व्यापाऱ्याला देखील विकायला देत नाहीत. ते आपल्या परस्पर संपर्कातील लोकांशी संपर्क करुन आणि सोशल मिडीयाचा वापर करुन संपूर्ण माल विक्री करतात. त्यामुळे त्यांना व्यापाऱ्याला किंवा समितीमध्ये कमी भावाने माल विकावा लागत नाही आणि दुसरी बाब म्हणजे ट्रान्सपोर्ट खर्चाची बाचत होत असल्याने त्यांना त्यांच्या मेहनतीचा पूरेपूर नफा मिळतो. अशा प्रकारे विनोद रायते यांना सेंद्रिय शेती केल्याचा प्रचंड लाभ मिळतो आहे.