Farmer Dilip Lanje: तुमसर तालुक्यातील चांदपूर गावातील उद्योगशील शेतकऱ्याचे नाव आहे, दिलीप लांजे. त्यांनी एमएससी बॉटनीमध्ये शिक्षण घेतले आहे. शेतात असलेल्या केवळ 5 आंब्याच्या झाडांपासून आपल्या व्यवसायाची सुरुवात करणारे लांजे हे आज फळबाग, सेंद्रिय पद्धतीने पिकविला जाणारा तांदूळ आणि इतर आंतरिक पिके घेऊन लाखोंचा नफा मिळवत आहेत.
Table of contents [Show]
5 झाडांपासून केली सुरुवात
1990 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी फळ लागवडीची योजना आणली होती. त्या काळात दिलीप लांजे यांच्या शेतात केवळ 5 आंब्याची झाडे लावली होती. त्या पाच झाडांना आलेले आंबे ते नागपुरातील कळमना मार्केटमध्ये विक्री करत असे. आंब्याला मिळत असलेली मागणी लक्षात घेता, लांजे यांनी फळशेती करण्याचा निर्णय घेतला आणि 5 एकर शेतीत आंब्याची लागवड सुरु केली. दिलीप लांजे यांच्याकडे सध्या एकूण 17 एकर शेती आहे.
5 एकरात 225 आंब्याची झाडे
आंब्याच्या 5 एकर फळशेतीमध्ये आज दिलीप यांच्याकडे लंगडा या जातीच्या आंब्याची 70 ते 80 झाडे, दशेरी आंब्याची 40 ते 50 झाडे, केशरी आंब्याची 20 ते 25 झाडे, चौरसा आंब्याची 3 झाडे, फजली आंब्याचे एक झाड आणि तोतापुरी आंब्याची 4 ते 5 झाडे आहेत. अशी एकूण 225 आंब्याची झाडे 5 एकर शेतीत आहे. यामध्ये असलेला फजली आंबा हा एक ते सव्वा किलोच्या जवळपास असतो आणि हा आंबा 100 रुपयाला एक किलो असा विकला जातो. खते, वाहतुकीचा खर्च, मजुरांचा खर्च, इत्यादी खर्च वजा करता दिलीप यांना आंब्याच्या फळशेतीमधून वर्षाला 5 ते 6 लाखांचा नफा मिळतो.
सेंद्रिय पद्धतीने तांदळाचे उत्पादन
दिलीप लांजे हे सेंद्रिय पद्धतीने विविध प्रकारच्या तांदळाचे उत्पन्न देखील घेतात. आतापर्यंत त्यांनी कालीमूच, वर्षा, जयश्रीराम यासारख्या तांदळाचे उत्पन्न घेतले आहे. तर पुढल्या वर्षी त्यात चिन्नौर हा तांदळाचा लोकप्रिय प्रकार देखील ते सहभागी करणार आहेत. तांदळाचे पिक हे रब्बी आणि खरीप हंगामात घेतल्या जाते. दोन्ही हंगामात लागणारी सर्व प्रकारची सेंद्रिय खते, वाहतुकीचा खर्च, मजुरांचा खर्च आणि इतर सर्व खर्च लक्षात घेता, 5 एकराला 1 लाख रुपयांची लागत लागते. सर्व खर्च वजा करून वर्षाला 6 ते 7 लाखांचे उत्पन्न मिळते, असे मत दिलीप यांनी व्यक्त केले.
ग्राहकांना नैसर्गिक चव प्रिय
तांदळाच्या पिकासह दिलीप हे आंतरिक पिके सुध्दा घेतात. ज्यामध्ये भाजीपाला, पोपट, तूर, तीळ, हळद, कार्ली यांचे उत्पादन घेतल्या जाते. यामधून मिळणारा वार्षिक नफा 1 ते 2 लाखाच्या वर जातो. अशाप्रकारे विविध प्रयोग करीत, विविध पिके घेऊन बागायती पद्धतीची शेती करणारे शेतकरी दिलीप लांजे यांना वर्षाला 15 लाखांच्या जवळपास वार्षिक नफा शेतीच्या माध्यमातून होतो. तर ग्राहकांना देखील यांच्या शेतीतील नैसर्गिक फळांची आणि शेतमालाची चव आवडते. त्यामुळे त्यांना प्रतिसादही छान मिळतो. आता शेतीमध्ये पिके घेणं परवडत नाही, असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांपुढे दिलीप लांजे यांनी उत्कृष्ट उदाहरण उभे केले आहे.