Two Wheelers Price: दुचाकी गाड्यांच्या किंमती मागील पाच-सहा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. इतकंच काय की, ग्रामीण भागातील गाड्यांचा खप कमालीचा रोडावला आहे. सध्या दुचाकी गाड्यांवर 28% जीएसटी आकारला जातो. हा जीएसटीचा दर 18% करावा, अशी मागणी Automobile Dealers Associations (FADA) ने जीएसटी परिषदेकडे केली आहे.
किंमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर
जास्त कर आकारणीमुळे गाड्यांच्या किंमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे डिलर्स असोसिएशनने म्हटले आहे. दुचाकी विक्रेत्यांची FADA ही शिखर संघटना आहे. मागील काही वर्षांपासून दुचाकीच्या किंमती वाढल्यामुळे विक्री घटली आहे. सर्वसामान्य नागरिकांना नवी दुचाकी घेणे परवडत नाही. दुचाकी निर्मिती क्षेत्राला पुन्हा नव्याने उभारी मिळाली यासाठी गाड्यांवरील वस्तू आणि सेवा कर कमी करावा, अशी मागणी FADA ने केली आहे.
2016 आणि आताच्या किंमतीतील तफावत किती
होंडा अॅक्टिव्हा स्कूटर 2016 साली 52 हजार रुपयांत मिळत होती. मात्र, 2023 साली होंडा अॅक्टिव्हा ची किंमत 88 हजार रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे बजाज पल्सर दुचाकी 2016 साली 72 हजार रुपयांना खरेदी करता येत होती ती आता दीड लाख रुपयांना मिळते. हिरो स्प्लेंडर गाडीची किंमत 46,000 हजारांवरून 74,801 हजारांच्या पुढे गेली आहे. गाड्यांच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
2016 सालच्या आकडेवारीचा विचार करता एकूण ऑटोमाबाईल विक्रीपैकी दुचाकींचा वाटा 78% होता. मात्र, किंमतवाढीमुळे दुचाकी विक्रीचा वाटा 72% पर्यंत खाली आला. करकपात केल्यास ग्रामीण भागातील गाड्यांची विक्रीही वाढेल. तसेच इतर वाहतुकीच्या पर्यायांमध्ये दुचाकी जास्त स्पर्धात्मक होईल, असे FADA ने म्हटले आहे.
दुचाकी वाहनांच्या किंमती का वाढल्या?
मागील काही वर्षात कच्च्या मालाच्या किंमती, वाहतूक खर्च, निर्मिती खर्चात मोठी वाढ झाली आहे. तसेच कोरोना, रशिया-युक्रेन युद्धाचा परिणामही किंमत वाढीवर झाला. सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी भारत 6 नियमावली लागू केली आहे. त्यामुळे कंपन्याना प्रदूषण कमी होण्यासाठी इंजिनमध्ये बदल करावा लागला. त्यामुळे गाड्यांच्या किंमती वाढल्या