बदलती जीवनशैली आणि इतर अनेक कारणांमुळे भारतात कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यातही वयस्कर व्यक्तींमध्ये हे प्रमाण अधिक आहे. उतारवयातील बर्याच व्यक्तींचे उत्पन्नाचे स्रोतही नसतात. भारतात कर्करोगांवरील उपचार इतके महाग आहेत की सामान्य माणसाला किती खर्च होईल याची कल्पना करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने कमवायला लागल्यापासूनच आपला आणि आपल्या कुटुंबाचा आरोग्य विमा काढायला हवा. शिवाय आरोग्य विम्याची जी प्रीमियम रक्कम भरली जाते, ती रक्कम आयकर सवलतीसही पात्र असते.
आज बाजारात असणाऱ्या बहुतांश आरोग्य विमा पॉलिसी कर्करोगासकट जवळजवळ सर्व गंभीर आजारांसाठी संरक्षण देतात, पण ह्या पॉलिसी साधारणपणे फक्त भारतात रुग्णालयात दाखल होण्याचे आणि उपचाराचे खर्च देतात. संपूर्ण उपचाराचा खर्च दिला जात नाही. सामान्य माणूस 5 लाखापेक्षा अधिक रकमेचा आरोग्य विमा काढत नाही, त्यामुळे विम्याची रक्कम पुरेशी नसते.
कर्करोग विमा
कर्करोग विमा हा गंभीर आजार पॉलिसीचा विशिष्ट प्रकार आहे. साधारणपणे, कर्करोग विमा हा कर्करोग निदान आणि उपचारादरम्यान रुग्णायलयात दाखल, रेडियेशन, किमोथेरपी, शस्त्रक्रिया इत्यादी साठी येणार्याय खर्चासाठी संरक्षण देतो. कर्करोगाचे निदान झाल्यास हा विमा रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबियांना आर्थिक आणि मानसिक आधार देतात. स्तन कर्करोग, अंडाशय कर्करोग, फुफ्फुस कर्करोग, घसा कर्करोग आणि पुरस्थग्रंथी कर्करोग हे काही सामान्यपणे आढळणारे कर्करोग अशा विमा पॉलिसी अंतर्गत समाविष्ट असतात. बाजारात असलेल्या कर्करोग विमा उत्पादनांपैकी आयसीआयसीआय प्रूडेंशियल चे कॅन्सर केयर प्लस आणि एचडीएफसी लाइफ कॅन्सर केयर हे आहेत. या व्यतिरिक्त एगॉन रेलिगेयर ह्यांनी आयकॅन्सर विमा योजना सुरू केली आहे.
विमा पॉलिसीचा लाभ कसा मिळतो
काही विमा पॉलिसी मध्ये विम्याच्या संपूर्ण मुदतीसाठी नियमित निशुल्क कर्करोग चाचण्या दिल्या जातात. मात्र बहुतांश कर्करोगाच्या प्रकारासाठी निदान, उपचार, लहान व मोठी शस्त्रक्रिया, आणि गंभीर परिस्थिती मध्ये विविध टप्प्यात रक्कम दिल्या जाते. उदाहरणार्थ, जर विमा असलेल्या व्यक्तिला विशिष्ट तीव्रतेचा कर्करोग झाला, तर लागू असलेल्या मर्यादेनुसार आश्वस्त रक्कम एकरकमी दिली जाते. साधारणपणे कर्करोग लाभासाठी रक्कम देताना, रोगाच्या तीव्रतेचे टप्प्यात वर्गीकरण केले जाते. देय रक्कम ही रोगाच्या तीव्रतेवर आणि आधी ह्याच विम्याअंतर्गत केलेल्या दाव्यावर अवलंबून असते.
कर्करोग विम्यासाठी पात्रता
कर्करोग विम्यासाठी किमान वय १८ व कमाल वय ६५ असावे लागते, आणि किमान आश्वस्त रक्कम रु ५ लाख आणि कमाल रक्कम रु. ५० लाख असते. ६५ वर्षे वयानंतर विमा नूतनीकरण प्रत्येक विम्यासाठी वेगळे असते. कर्करोग विम्याचा अजून एक फायदा म्हणजे ते इतर आरोग्य विम्यांपेक्षा कमी किंमतीत मिळतात. या शिवाय, त्यासाठी भरलेल्या हप्त्यांवर आयकर अधिनियमाच्या कलम ८० D खाली करसवलत मिळते. पण, अशा विम्यात साधारणपणे मृत्यू झाल्यास, मुदत संपल्यावर किंवा विमा परत केल्यावर कुठलेही लाभ मिळत नाहीत
किती प्रिमिअम असतो
३० वर्षांच्या व्यक्तीने जर 10 लाख रुपयांचे फक्त कर्करोगाला संरक्षण देणार्या पॉलिसीसाठी 3500 रुपयांपर्यंत प्रीमियम भरावा लागेल. विमा उतरविताना जेवढे वय जास्त, तेवढी साहजिकच ‘प्रीमियम’ची रक्कमही जास्त.
असे असले तरी कर्करोग विम्यापेक्षा सर्वसमावेशक आरोग्य विमा हा सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो कारण. कर्करोग विम्यामध्ये फक्त कर्करोगाचेच उपचार केले जातात. तर आरोग्य विम्यामध्ये अनेक गंभीर आजारांचा समावेश असतो.