Electric Vehicle Charging Station : सध्याच्या महागाईमध्ये(Inflation) पेट्रोल(Petrol), डिझेलच्या(Diesel) किमती गगनाला भिडल्या आहेत. हे कमी की काय म्हणून सीएनजीचे दरही(CNG rate) वाढत चालले आहेत. इंधनाचे वाढलेले दर लक्षात घेऊन आता इलेक्ट्रिक वाहनांची(Electric Vehicle) मागणी वाढली आहे आणि याला ग्राहक चांगला प्रतिसादही देत आहेत. खर्च तर कमी होतोच यासोबत प्रदुषणही(No Pollution) होत नाही. प्रमुख शहरांसोबत आता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी गाव-खेड्यातही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. खाजगी आणि सार्वजनिक वाहनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळेच तर इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनचा व्यवसाय वाढत चालला आहे. तुमच्याकडे फक्त थोडीशी जमीन(Land)आणि केवळ 1 लाख रुपये गुंतवण्याची तयारी असेल तर मग तुम्हीही सहजपणे या व्यवसायातून भरपूर कमाई करू शकता.
सरकारकडून परमिट घ्यावे लागेल?
EV चार्जिंग स्टेशनसाठी सरकारकडून कोणत्याही परमिटची आवश्यकता लागणार नाही. कोणताही व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही परवानगीविना पब्लिक चार्जिंग स्टेशन उभारू शकणार आहे. त्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता लागणार असून त्यात चार्जिंग तंत्र, सुरक्षा आणि परफॉर्मिंग स्टँडर्ड व काही प्रोटोकॉलचे पालन करणे गरजेचे आहे. जर तुमचे भांडवल कमी असेल तर काही जणांना सोबत घेऊन तुम्ही सेल्फ हेल्प ग्रूपच्या माध्यमातून याची सुरुवात करू शकता. सेल्फ हेल्प ग्रूपला बँकेकडून कर्ज देण्यात येते. या कर्जातून तुम्ही EV चार्जिंग स्टेशन उभारू शकता.
EV चार्जिंग स्टेशनसाठी कोणत्या गोष्टी असणे अत्यावश्यक?
स्टेशन उभारण्याकरिता मोठ्या प्रमाणावर खर्च हा चार्जिंग टॉवरच्या(Charging Tower) उभारणीवर होतो. तुम्ही दुचाकी, तीन चाकी, व्यावसायिक, खाजगी, ट्रक किंवा विजेवर चालणाऱ्या बससाठी चार्जिंग स्टेशन उभारू शकता. चार्जिंग स्टेशन बनवण्यासाठी तुम्हाला वीज कनेक्शन(Power connection) असणे बंधनकारक राहील. हस्तांतरणासह जोडण्यासाठी हेवी ड्यूटी केबलिंगचे काम करून घ्यावे लागणार आहे. चार्जिंग स्टेशन उभारण्याकरिता जमीन ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. तुमच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर किंवा भाडेतत्त्वावर(rent) मोक्याच्या ठिकाणी जमीन घेऊन तुम्ही हे स्टेशन उभारू शकता . याशिवाय चार्जिंग स्टेशनशी संबंधित शेड, पार्किंग एरिया(Parking Area) इत्यादी पायाभूत सुविधाही तुम्हाला द्याव्या लागतील.
चार्जरच्या क्षमतेवर ठरेल खर्च?
जर तुम्हाला देखील इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर यासाठी येणारा खर्च तुम्ही वापरणाऱ्या चार्जरच्या क्षमतेवर आधारित असणार आहे. यामध्ये कमीत कमी 1 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. पण तुम्हाला जर जास्त क्षमतेचा चार्जर बसवायचा असेल तर हा खर्च 40 लाख रुपयांच्या आसपास जाऊ शकतो. ए.सी. स्लो चार्जर(A.C. Slow Charger) तुलनेने स्वस्त असतात तर डी. सी. फास्ट चार्जर(D.C. Fast Charger) महाग असतात. एका डी.सी.चार्जरची किंमत 1-15 लाख रुपयांच्या आसपास असते. तर ए.सी.चार्जरची किंमत 20-70 हजार रुपयांच्या घरात पाहायला मिळते. फास्ट चार्जरचा वापर करताना फ्ल्युएड-कूल्ड बॅटरी चार्ज करण्यासाठी पीसीएसमध्ये लिक्विड-कूल्ड वायर असणे आवश्यक आहे.