शेअर बाजारातील अस्थिरतेचा फटका म्युच्युअल फंड उद्योगाला बसला आहे. सप्टेंबर 2023 या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमध्ये 13857 कोटींची गुंतवणूक झाली. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये इक्विटी फंडातील गुंतवणूक 30% ने आटली आहे.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार (AMFI) मासिक स्तरावर सप्टेंबर महिन्यातील इक्विटी फंडातील गुंतवणूक कमी झाली आहे. मात्र कामगिरीचा विचार केला तर स्मॉल आणि मिडकॅप फंडांनी लार्ज कॅप फंडांच्या तुलनेत दमदार कामगिरी केली. सप्टेंबरअखेर म्युच्युअल फंड उद्योगांकडे एकूण 46.58 लाख कोटींची मालमत्ता आहे.
ऑगस्ट महिन्यात इक्विटीशी संबधित म्युच्युअल फंड योजनांमध्ये 14091.3 कोटींची गुंतवणूक झाली होती. सप्टेंबरमध्ये मात्र त्यात 30.4% घसरण झाली आहे. इक्विटी फंडांतील गुंतवणूक 13857 कोटींपर्यंत खाली आली.
यात स्मॉल कॅप फंडांमध्ये गेल्या महिन्यात 2678.5 कोटींची गुंतवणूक झाली आहे. याच श्रेणीत ऑगस्ट महिन्यात 4264.8 कोटींची गुंतवणूक झाली होती. मिडकॅप योजनांमध्ये देखील गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आहे. मिडकॅपमध्ये 2000.9 कोटींची गुंतवणूक झाली आहे. ऑगस्टमध्ये 2512.3 कोटींची गुंतवणूक झाली होती.
लार्जकॅप फंडांना सप्टेंबर महिन्यात किंचित झळ बसली. सप्टेंबरमध्ये लार्जकॅप फडांतून 110.6 कोटी गुंतवणूकदारांनी काढून घेतले. दुसऱ्या बाजुला मल्टी कॅप फंडांसाठी मात्र सप्टेंबर महिना चांगला ठरला आहे. सप्टेंबरमध्ये गुंतवणूकदारांनी मल्टी कॅप फंडांत 2234.5 कोटींची गुंतवणूक झाली.
लिक्विड फंडांमधून गेल्या महिन्यात 74176 कोटी काढून घेण्यात आले. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 2.76 पट इतके होते. ऑगस्ट महिन्यातून बड्या गुंतवणूकदारांनी लिक्विड फंडांनी 26823.7 कोटींची गुंतवणूक काढून घेतली होती. एकूणच सप्टेंबर महिना म्युच्युअल फंड उद्योगासाठी त्रासदायक ठरला. इक्विटी, डेट आणि इतर सर्व म्युच्युअल फंड योजनांमधून गुंतवणूकदारांनी 66191 कोटींची गुंतवणूक काढून घेतली. ऑगस्ट महिन्यात मात्र 14385 कोटींची गुंतवणूक झाली होती.