शेअर बाजार सध्या उच्चांकी पातळीवर आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने रेकॉर्ड पातळी गाठली आहे. लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप अशा तिन्ही प्रकारातील शेअर्समध्ये तेजी आहे. या तेजीने इक्विटी म्युच्युअल फंडांची कामगिरी बहरली आहे. विशेषत: स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना मागील सहा महिन्यात 20% हून अधिक परतावा दिला आहे.
लार्ज कॅप आणि मिड कॅपच्या तुलनेत स्मॉल कॅप म्युच्युअल फंड अधिक जोखमीचे मानले जातात. जेव्हा बाजार कोसळतो तेव्हा घसरणीची सर्वाधिक झळ स्मॉल कॅप गटातील शेअर्सला बसते. बाजारात जेव्हा नकारात्मक वातावरण असते तेव्हा स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये अनिश्चितता देखील प्रचंड दिसून येते. मात्र यातील काही निवडक स्मॉल कॅप फंडांनी मागील सहा महिन्यात गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे.
दिर्घकाळातील गुंतवणुकीचा विचार केला तर स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांतील काही निवडक योजनांनी सरस कामगिरी केली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाच्या (AMFI)आकडेवारीनुसार एचडीएफसी स्मॉल कॅप फंड, फ्रॅंकलिन इंडिया, निप्पॉन इंडिया, टाटा स्मॉल कॅप फंड आणि क्वांट स्मॉल कॅप फंड या योजनांनी गुंतवणूकदारांना 13 ते 20% रिटर्न्स दिले आहेत.
एचडीएफसी स्मॉल कॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅनमधूल गुंतवणूकदाराला सहा महिन्यात 21.13% रिटर्न मिळाला आहे. बीएसई 250 स्मॉल कॅप टोटल रिटर्न इंडेक्सशी ही योजना संलग्न आहे. फ्रॅंकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंडाने 20.36% रिटर्न्स दिला आहे. हा फंड निफ्टी स्मॉल कॅप 250 टोटल रिटर्न इंडेक्सशी संलग्न आहे.
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅनमधून गुंतवणूकदाराला 19.79% रिटर्न मिळाला आहे. टाटा स्मॉल कॅप फंडाने देखील दमदार कामगिरी केली आहे. टाटा स्मॉल कॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅनमधून गुंतवणूकदारांना सहा महिन्यात 15.48% रिटर्न मिळाला. निफ्टी स्मॉल कॅप 250 टोटल रिटर्न इंडेक्स हा या योजनेचा बेंचमार्क आहे.
क्वांट स्मॉल कॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅनमधून गुंतवणूकदाराला 13.05% परतावा मिळाला आहे. ही योजना निफ्टी स्मॉल कॅप 250 टोटल रिटर्न इंडेक्सशी संलग्न आहे.