ट्विटरचे (Twitter Inc) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी अलीकडे घेतलेल्या ट्विटर पोलमध्ये (Twitter Poll) 57% लोकांनी मस्क यांना सीईओ पद सोडण्याचाच सल्ला दिला . हा निर्णय आपल्याला मान्य असेल असं मस्क यांनी पूर्वीच म्हटलंय. पण, त्यामुळे मस्क थोडे अडचणीत सापडल्याचं दिसतंय. कारण, त्यांना मनापासून ट्विटरच प्रमुख पद सोडायचं आहे का? सोडलं तर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल याविषयी त्यांनी काही ठरवलंय का ? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.
ट्विटरवर झालेल्या एका ट्विटर स्पेसमध्ये मस्क यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याबद्दल एक वक्तव्य केलंय. ते म्हणतात, ‘ट्विटर अशा माणसाच्या हातात सोपवायची आहे जो कंपनीला उसळत्या लाटांमधून बाहेर काढून शांत समुद्रात आणेल.’
जानेवारी 2022 मध्ये मस्क यांनी ट्विटरमध्ये शेअर विकत घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर एप्रिल महिन्यात अख्खी कंपनी विकत धेण्यासाठी 44 अब्ज अमेरिकन डॉलरची ऑफर त्यांनी मूळ मालकांना दिली. ही रक्कम ट्विटर कंपनीसाठी खूप मोठी आहे असं लक्षात आल्यावर त्यांनी या डीलमधून बाहेर पडण्याचाही प्रयत्न केला. पण, तेवढ्यात ट्विटरने दिलेली ऑफर मागे घेता येणार नाही, अशी भूमिका घेत मस्क यांच्याविरुद्ध कोर्टात दावा ठोकला. तिथे खटला चालून निकाल मस्क यांच्या विरोधात गेला. आणि मस्क यांना आधीच्याच ऑफरमध्ये कंपनी विकत घ्यावी लागली.
ऑक्टोबर 2022 मध्ये मस्क यांच्याकडे ताबा आला. आणि तोपर्यंत ट्विटरकडे आता फक्त 1 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी रोख रक्कम शिल्लक असल्याचं मस्क यांनी म्हटलंय. त्यातच ट्विटर वापरणाऱ्या लोकांनी मस्क यांना पोलच्या माध्यमातून चले जाव असा संदेश दिल्यामुळे मस्क आणखी कोंडीत सापडलेत.
मस्क यांच्या सांगण्यावरून ट्विटरमध्ये गुंतवणूक केलेल्या त्यांच्या साथीदारांना मस्क ट्विटरमध्ये कायम हवे आहेत. तर टेस्लामधले त्यांचे गुंतवणूकदार अस मानतात की, त्यांचं लक्ष ट्विटरमध्ये जास्त असल्यामुळे टेस्लाचं नुकसान होतंय. त्यामुळे मस्क यांना ट्विटरसाठी नवा सीईओ नेमायचा झाल्यास तो असाच हवा आहे जो, प्रमुख पदाच्या जबाबदाऱ्या तर पार पाडेल. पण, कंपनीत बहुतांश समभाग एलॉन मस्क यांच्याकडे आहेत याचं भान ठेवेल.
मस्क यांच्या भाषेत सांगायचं तर, ‘कंपनीच्या महत्त्वाच्या विभागांचं नियंत्रण ते आपल्याकडेच ठेवणार आहेत. पण, कंपनीला आर्थिक दृष्ट्या पुन्हा ताळ्यावर कसं आणायचं याची दिशा त्या उमेदवाराकडे ठळकपणे हवी. ‘
मस्क यांनी अशा व्यक्तीचं वर्णन तीन शब्दांमध्ये केलं आहे. ‘आत्मविश्वासपूर्ण, थोडासा हेकेखोर किंवा उर्मट आणि भरपूर इमॅजिनेशन असलेला!’
फेसबुक किंवा इन्स्टाग्राम सारखं ट्विटर हा जाहिरातदारांना आकर्षित करेल इसं माध्यम किंवा व्यासपीठ नाही. त्यामुळे नवीन सीईओचं आव्हान हे जाहिरात फ्रेंडली बनवणं हेच असणार आहे.
अर्थात, हे सगळं तेव्हाच लागू होईल जेव्हा एलॉन मस्क खरंच ट्विटरचं प्रमुख पद सोडायला तयार होतील. अमेरिकेतल्या काही जाणकारांचं तर असंही म्हणणं आहे की, मस्क कायमस्वरुपी एखाद्याला हे पद देतील, अशी शक्यता कमीच आहे. ते काही काळासाठी माणूस नेमून नंतर त्याला पदावरून दूर करू शकतील.